जिल्हा रूग्णालय आगीला शल्यचिकित्सक, बांधकामचे अधीक्षक जबाबदार



 अहमदनगर| जिल्हा रूग्णालयाला आग लागली याला जिल्हा शल्यचिकित्सक जेवढे जबाबदार आहेत, तेवढेच बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जबाबदार आहे. या दोन्ही अधिकार्‍यांचे तात्काळ निलंबन करून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली.

नांदगावकर यांनी सोमवारी सकाळी जिल्हा रूग्णालयातील आग लागलेल्या अतिदक्षता विभागाची पाहणी केली. यावेळी त्याच्यासोबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, देविदास खेडकर, नितीन भुतारे, गजेंद्र राशीनकर, सुमित वर्मा, परेश पुरोहित, गणेश रांधवणे, बाबासाहेब शिंदे आदी उपस्थित होते. यानंतर नांदगावकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, जिल्हा रूग्णालयात सर्वसामान्य रूग्णांवर उपचार केले जाते, त्यामुळेच सरकार या रूग्णालयाकडे लक्ष देत नाही. नगर जिल्हा रूग्णालयाचे फायर ऑडिट झाल्याची माहिती मला देण्यात आली. त्यामध्ये त्रुटी होत्या.

दोन कोटी 60 लाखांचा निधी देण्यात आला नव्हता. 11 लोकांचे प्राण गेल्यानंतर सरकारकडून निधी देण्यात आला, यात सरकारची बेजाबदारी समोर येते. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी बांधकाम विभागाकडून चांगल्याप्रकारे काम करून घेतले नाही. ते जेवढे या आगीला जबाबदार आहेत, तेवढेच बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जबाबदार आहे. सरकारने चौकशी समिती नियुक्त केली असली तरी या दोन्ही अधिकार्‍यांचे निलंबन करून चौकशी केली पाहिजे, अशी मागणी नांदगावकर यांनी केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post