जिल्ह्यातील शाळांमध्ये आज 'राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण'


 नाशिक ।नाशिक जिल्ह्यातील एकूण 231 शाळांमध्ये राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाअंतर्गत National Achievement Survey आज शुक्रवारी चाचणी घेण्यात येत आहे. तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या मिळून 7,562 विद्यार्थ्यांचा या सर्वेक्षणात समावेश असून यासाठी विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती राहण्याची दक्षता घेण्याचा आदेश देण्यात आला आहे.


राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाच्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) State Council for Educational Research Training शाळांना परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. यापूर्वी 2017-2018 मध्ये तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामुळे तीन वर्षांनी पुन्हा हे सर्वेक्षण करण्यात येत आहे.


सर्वेक्षणासाठी निवडलेल्या शाळा सकाळी साडेसात वाजता सुरू करण्यात येणार आहेत. एका बाकावर एक विद्यार्थी बसवावा. बाके उपलब्ध नसल्यास स्वच्छ चटई वापरून पुरेसे अंतर राखण्यात यावे. चाचणीसाठी निवडलेल्या शाळेचे माध्यम आणि इयत्तानिहाय वर्गाच्या एकापेक्षा जास्त तुकड्या असल्यास सर्व तुकड्यांतील विद्यार्थी उपस्थित असावेत.


या विद्यार्थ्यांतून एक तुकडी यादृच्छिक पद्धतीने क्षेत्रीत अन्वेषकांमार्फत निवडली जाईल. संपादणूक चाचणी सोडवण्यासाठी तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी साडेदहा ते बारा, पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी साडेदहा ते साडेबारा अशी वेळ देण्यात आली आहे. सर्वेक्षणातील शाळांतील माध्यमनिहाय, इयत्तानिहाय शिकवणारे सर्व विषयांचे शिक्षक शाळेत उपस्थित असणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post