जामखेड | भाषण सुरू असताना समोर उपस्थितांमधून काही जण विविध मागण्या व सूचना करत राहिल्याने शेवटी न राहवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये त्यांचा समाचार घेतला. तुला लईच कळतंय रं. येथे येऊन भाषण कर. आमच्या बारामतीत मी बोलायला लागलो की सगळे चिडीचूप असतात. येथे उगीच रोहितला त्रास होईल म्हणून ऐकून घेतोय. नाहीतर हिसका दाखविला असता, अशा शब्दांत मध्येच बोलणार्यांना अजितदादांनी सुनावले.
जामखेडमध्ये शनिवारी एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरू होते. यावेळी ते कामांची माहिती देत असताना उपस्थितांमधून काही जण त्यांना सूचना करीत होते. वीज पुरवठा, शेतीमालाचा भाव वगैरे संबंधी मुद्दे मांडत होते. एक दोनदा दुर्लक्ष केल्यानंतर अखेर पवार भडकले. एकाला उद्देशून ते म्हणाले, तुला लईच कळतंय रं. येथे येऊन भाषण कर. आम्ही काय असेच उठून आलेलो नाही. सात वेळा दीड दीड लाख मते घेऊन निवडून आलो आहोत. आमच्या बारामतीत असे कोणी मध्ये बोलत नाही. मी बोलत असताना लोक चिडीचूप असतात. येथे मध्ये मध्ये बोलायची सवय आहे. उगीच रोहितला त्रास व्हायला नको म्हणून ऐकून घेतो. नाही तर माझा हिसका दाखविला असता. ऐकून घेतोय तर मध्येच बोलतात, असे पवार यांनी सुनावल्यानंतर सगळेच शांत झाले.
विरोधकांकडून फसवे राजकारण
त्रिपुरा येथील घटनेचे पडसाद मालेगाव, नांदेड, अमरावती येथे उमटले. हे प्रकार समाजकंटक आणि विध्वंसक वृत्तीच्या लोकांनी घडवून आणले आहेत. ज्यांना चांगले चाललेले बघवत नाही, असे लोक हे प्रकार करतात. मात्र, याचा फटका सामान्यांना बसतो. राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होते. यासाठी तरुणांचा वापर केला जातो. त्यामुळे तरुणांनी अशा गोष्टींना बळी पडता कामा नये. एसटी कर्मचार्यांच्या संपाच्या बाबतीतही हेच सुरू आहे. एसटीला साठ वर्षे होऊन गेली आहेत. आम्हालाही वाटते की कर्मचार्यांचे भले व्हावे. जे शक्य आहे, ते आम्ही करीत आलो आहोत. तीही आपलीच माणसे आहेत. शिवाय प्रवाशांचाही विचार करावा लागणार आहे. असे असताना त्यांना आंदोलनासाठी भडकावले जात आहे. आता त्यांनीच विचार करावा की त्यांचे हित कशात आहे. आम्ही तर जे शक्य आहे, ते करणारच आहोत. सध्या काहींचे फसवे राजकारण सुरू आहे. लोकांना त्रास होईल, या पद्धतीने राजकारण केले जात आहे. आतापर्यंत ज्या गोष्टी घडल्या नव्हत्या, त्या राज्यात घडत आहेत. त्यामुळे राज्यातील सुज्ञ जनतेने आता विचार केला पाहिजे. महाविकास आघाडीचे सरकार जातपात, धर्म, नातीगोती यांचा विचार करीत नाही. सर्वांचे हित साधणे, सर्वांची कामे करणे हीच आमच्या कामाची पद्धत आहे, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
शिंदेंना टोला...उगीच ढुसण्या देत काय बसले ?
विकास कामांवरून श्रेयवादाचा संदर्भ देत उपमुख्यमंत्री पवार यांनी भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनाही टोला लगावला. आ. रोहित पवार यांनी केलेल्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नका. जी कामे तुम्ही केली, ती आम्ही मान्य करतो. तशी आमची कामे तुम्ही मान्य करा. लोकांनी तुम्हाला नाकारले आहे. आता गपगुमान बसा. आपण कुठे कमी पडलो, याचे आत्मचिंतन करा. त्यातून बोध घ्या. चांगल्या कामाचे कौतुक करायला शिका. फुकटचे श्रेय घेऊ नका. उगीच ढुसण्या देत बसण्यात काय अर्थ आहे?, असा चिमटा पवार यांनी शिंदे यांना काढला.
Post a Comment