अहमदनगर | नगर जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमधील आयसीयू क्रमांक एक वॉर्डमध्ये भाऊबीजेच्या दिवशी (दि.6) अग्नितांडव घडून 11 रुग्णांचा करुण मृत्यू आणि 6 रुग्ण जखमी झाले होते. या घटनेची चौकशी करण्यासाठी शासनाने नेमलेल्या नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखालील आठ सदस्यीय समितीची मंगळवारी (दि.16) नाशिकरोड येथे विभागीय आयुक्तालयात बैठक पार पडली. सकाळी अकरा वाजता सुरू झालेली ही बैठक सायंकाळी सात वाजेपर्यंत देखील सुरूच होती. तब्बल आठ तासांहून अधिक वेळ सलग सुरु राहिलेल्या या चौकशी समितीच्या बैठकीत शासनास अंतिम अहवाल सादर करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
नगर जिल्हा रुग्णालय आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या या समितीची ही बैठक विभागीय आयुक्त गमे यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्तालयात काल सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. या चौकशी समितीच्या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभाग, अग्निशमन विभाग, विद्युत विभागासह इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्तालयात झालेली या समितीची ही दुसरी बैठक होती.
पहिली बैठक यापूर्वी नगर येथे झालेली असून या बैठकीवेळी या समितीचे अध्यक्ष आणि विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या उपस्थितीत स्थळनिरिक्षण करण्यात आले होते. विभागीय आयुक्तालयात मंगळवारी पार पडलेल्या या चौकशी समितीच्या बैठकीतील तपशील प्रशासकीय गोपनीयतेचा भाग म्हणून उपलब्ध होऊ शकला नसला तरी आठ तासांहून अधिक काळ या चौकशी समितीचे कामकाज चालल्याने नगर जिल्हा रुग्णालय आगीच्या घटनेच्या निमित्ताने बर्याच बाबी उजेडात येण्याची शक्यता वाढली आहे.
नगर जिल्हा रुग्णालय आगीच्या घटनेनंतर तोफखाना पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक जुबेर मुजावर यांनी सरकारपक्षातर्फे दिलेल्या फिर्यादीवरून डॉ. विशाखा शिंदे, चन्ना अनंत, सपना पठारे आणि आसमा शेख या तिघी स्टाफ नर्सच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर शासनाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढाकणे, डॉ. विशाखा शिंदे यांच्यासह स्टाफ नर्स सपना पठारे यांच्यावर निलंबनाची तर चन्ना अनंत आणि आसमा शेख या दोघी स्टाफ नर्सवर सेवा समाप्तीची कारवाई केली होती. आता या घटनेप्रकरणी नियुक्त चौकशी समितीच्या अहवालानुसार नगर जिल्हा रुग्णालयातील अजून डॉक्टर्स, कर्मचारी की इतर जबाबदार यंत्रणा दोषी आढळतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Post a Comment