पालकमंत्र्यांचे वरातीमागून घोडे



 अहमदनगर | वरातीमागून घोडे दामटण्याचा प्रत्यय जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेनंतरही आला आहे.

११ जणांचा जीव गेल्यानंतर शासनाचे डोळे उघडले असून नगरच्या देशपांडे रुग्णालयासाठी ७ कोटी तर जिल्हा रुग्णालयातील अग्निरोधक यंत्रणेसाठी २ कोटी ५० लाखांच्या निधीला मंजुरी देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर जिल्हा शल्यचिकित्सकांची चौकशी करून कारवाईचा ठराव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

शनिवारी जिल्हा सामान्य रूग्णालयातील करोना उपचारासाठी असलेल्या अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला. या घटनेने व्यवस्थेचे धिंडवडे काढल्यानंतर सरकारी यंत्रणेकडून पुढील कार्यवाहीला गती देण्यात आली आहे. सोमवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हाच विषय पटलावर होता. याबाबत पालकमंत्री मुश्रीफ यांनी माध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले, जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या तक्रारी केल्या आहेत. त्यातच जिल्हा रुग्णालयात अनीतांडव झालेले आहे. यामुळे या आगीच्या घटनेसह जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्या कामाची चौकशी करून तात्काळ त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा ठराव घेण्यात आला आहे.

त्यांच्यावर निलंबनाची अथवा सक्तीच्या रजेवर पाठवण्याची कारवाई करण्याचा ठराव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ठराव घेऊन आरोग्य मंत्र्यांकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ त्यांनी दिली. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीसंदर्भात पहिली कारवाई जिल्हा शल्यचिकित्सकांवर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जबाबदार कोण?

दरम्यान, आगीच्या घटनेला जबाबदार कोण, यावरून एकाच सरकारचे मंत्री वेगवेगळे विधाने करत आहेत. काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अग्निरोधक यंत्रणेतील दिरंगाईचे खापर सार्वजनिक बांधकाम विभागावर फोडले होते. त्यांचा हा दावा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी फेटाळून लावला आहे. जिल्हा रुगणालयातील घटनेसाठी एकट्या बांधकाम विभागाला जबाबदार धरता येणार नाही, असे त्यांनी सांगीतले. घडलेली घटना ही सामुहिक जबाबदात झालेल्या चुकीचा परिणाम असल्याचे ते म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post