अहमदनगर | जिल्हा रुग्णालयातील अग्नीतांडव प्रकरणी दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी मंगळवारी निलंबित जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांचा जबाब नोंदविला. डॉ. पोखरणा यांना भादंवि 160 नुसार नोटीस पाठविली होती. त्यानुसार ते मंगळवारी सकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यावेळी हजर होते. पोलिसांनी भादंवि 161 नुसार त्यांचा जबाब नोंदविला आहे. दरम्यान, या घटनेशी संबंधित इतर सहा जणांना पोलिसांनी मंगळवारी नोटीस पाठवून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
अग्नीतांडव प्रकरणी पोलिसांनी फिर्यादी होत गुन्हा दाखल केला आहे. दाखल गुन्ह्यात एका वैद्यकीय अधिकार्यांसह चार जणांना अटक केली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी आतापर्यंत 12 जणांचे जबाब नोंदवले आहेत. काही व्यक्तींचे भादंवि 164 नुसार जबाब नोंदविले आहेत. डॉ. पोखरणा यांना न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यांना तपासाला सहकार्य करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी त्यांना बोलविले होते. डॉ. पोखरणा मंगळवारी सकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात आले होते.
अतिदक्षता विभागाला आग लागलेली घटना डॉ. पोखरणा यांना कशी कळली, ते घटनास्थळी केव्हा दाखल झाले. त्यांनी या आगोदर काय काय उपाययोजना केल्या होत्या किंवा नव्हत्या. जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभाग केव्हा व कधी सुरू केले होते? या ठिकाणी असे कामकाज चालत होते. असे विविध प्रश्न पोलिसांनी त्यांना चौकशीदरम्यान विचारले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Post a Comment