सोनई | नेवासा तालुक्यातील शनीशिंगणापुरात भाविकांची गर्दी वाढली तसे कमिशन एजंटांचे (लटकू) प्रमाण दुपटीने वाढले आहे. सक्ती व अडवणुकीची साडेसाती शनिभक्तांना सहन करावी लागत आहे.पोलीस अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याने नाराजीचा सूर वाढत आहे.
मागील पंधरवड्यात सोनईत झालेल्या शांतता कमेटी बैठकीत पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी सोनई व शनिशिंगणापूर पोलिसांना लटकूंचा बंदोबस्त करा, असा आदेश जाहीर भाषणात दिला होता. या आदेशानंतर लटकू कमी होण्याऐवजी त्यात दुपटीने वाढ झाली. शनिदेवता साडेसाती निवारण करणारी ग्रहदेवता असली तरी भाविकांना लटकूंची साडेसाती मुकाट्याने सहन करावी लागत आहे.
राहुरी ते शिंगणापूर व घोडेगाव ते शिंगणापूर मार्गावर मोटारसायकल वरील लटकू मोठ्या प्रमाणात वाढले असून ते भरधाव वेगात वाहनांचा पाठलाग करतात. लटकूंच्या चुकीने यापुर्वी अनेकांना जीव गमवावा लागला तर अनेकांना अपंगत्व आले आहे.
काल गुरुवारी दुपारी सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य नितीन प्रभाकर दरंदले यांना एका लटकूने जोराची धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. नगरच्या खासगी रुग्णालयात ते मृत्यूशी झुंज देत आहेत.
सोनई पोलिसांच्या भुमिकेबाबत नाराजीचा सूर आहे. सोनई व शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु आहेत. मटका, जुगार, गावठी दारु,देशी-विदेशी दारु राजरोस विकली जात आहे.पोलिसांच्या आशिर्वादाने बेकायदा
प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असून एसटी संपानंतर अव्वाचे सव्वा भाडे घेत नियमबाह्य वाहतुक होत असताना आठ दिवसात एकही कारवाई झाली नाही. दिवाळी सुट्टीची प्रचंड गर्दी असताना शिंगणापूर पोलिसांच्या लटकू बंद मोहिमेचा पुरता फज्जा उडाला आहे.
पोलीस ठाण्यासमोरच अडवणूक
पोलीस ठाण्यासमोरील वाहनतळावर सर्वाधिक गुन्हेगार प्रवृतीचे ‘लटकू’ याच पार्किंगसाठी काम करत असल्याची तक्रार परीसरातील ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांनी याबाबत लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.
Post a Comment