मुंबई: शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी शनिवार (18 डिसेंबर) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शिवसेना मंत्री अनिल परब यांच्यावर टीकेची झोड उठवली. यासोबतच अनिल परबांच्या रिसॉर्टवर कारवाई व्हावी यासाठी आपण किरीट सोमय्या यांना मदत केल्याचा आरोपही खोटा असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
आपण किरीट सोमय्या यांना अनिल परबांच्या रिसॉर्टबद्दल माहिती दिल्याचा आरोप आपल्यावर केला जात आहे, त्याबाबत आपलं काय म्हणणं आहे. असा सवाल रामदास कदमांना करण्यात आला होता. याबाबत बोलताना रामदास कदम यांनी सर्वात आधी बाळासाहेबांची शपथ घेत सगळे आरोप फेटाळून लावले. पाहा किरीट सोमय्यांबाबत काय म्हणाले रामदास कदम
'मागच्या तीन-चार महिन्यात माझ्याविरुद्ध मीडियामध्ये उलटसुलट बातम्या सुरु आहेत. म्हणून सगळ्या गोष्टींचा खुलासा व्हावा आणि माझी बाजू शिवसैनिकांसमोर यावी यासाठी मी पत्रकार परिषद घेत आहे.'
'मला जे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं काम केलं आहे. ते किती चुकीचं आहे आणि मला राजकीयदृष्ट्या उध्वस्त करण्याचं काम सुरु आहे. हे स्पष्टपणे दिसल्यानंतर आज मी ही पत्रकार परिषद घेऊन माझी बाजू मांडत आहे.'
'तथाकथित जी ऑडिओ क्लिप आली होती त्यात मी कुठेही शिवसेना पक्षाबाबत काहीही बोललो नाही. बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगेन की, आजपर्यंत मी कधीही किरीट सोमय्यांसोबत बोललो नाही. कधीही कोणतेही कागदपत्र दिलेले नाहीत. कुठलीही चर्चा माझी आणि त्यांची नाही.'
'पक्षाला हानी होईल अशी कोणतीही बाब माझ्याकडून झालेली नाही. याबाबत शिवसेना पक्षप्रमुखांना जे मी पत्र दिलं होतं ते आपल्याला देत आहे. दोन नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर येऊ नयेत म्हणून मी काही पथ्यं कालपर्यंत पाळली होती.
Post a Comment