गॅस पाईपलाईन व विजेचा लपंडाव... पाणी असून देखील जेऊर गाव तहानलेलेच

  माय अहमदनगर वेब टीम-

नगर तालुका- नगर तालुक्यातील जेऊर गावात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. पिंपळगाव तलावात मुबलक पाणी असून देखील गॅस पाईपलाईनच्या कामामुळे व विजेच्या लपंडावामुळे जेऊर गावावर पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे.

      याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर गावाला पिण्याच्या पाण्यासाठी बु-हाननगर पाणी योजना तसेच पिंपळगाव तलावातून पाण्याचा पुरवठा होत आहे. पिंपळगाव तलावात जेऊर ग्रामपंचायत च्या वतीने बोअरवेल घेण्यात आला आहे. पाणीही मुबलक उपलब्ध आहे परंतु विजेचा लपंडाव व गॅस पाईपलाईन च्या कामामुळे पाणीपुरवठा करण्यात अडचण निर्माण झाली आहे.

      नगर औरंगाबाद रस्त्यालगत सुरू असलेल्या गॅसच्या पाइपलाइनच्या कामामुळे जेऊर गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन वारंवार फुटत आहे. तसेच विजेच्या लपंडावामुळे गावांमध्ये पाणीपुरवठा करण्यात अडचण निर्माण झाली आहे. पिंपळगाव तलावात मुबलक पाणीसाठा असून देखील गॅस पाईपलाईनचे काम व विजेच्या लपंडावामुळे ग्रामस्थांवर पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे.

     गावाला रोज पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. पाणी उपलब्ध असून देखील पाणी मिळत नसल्याने ग्रामपंचायत देखील हतबल झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तरी गॅसपाइपलाइनच्या काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर मनमानी काम करत असल्याबद्दल कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

______________________________________

 पिंपळगाव तलावात पाणी उपलब्ध आहे. परंतु गॅस पाईपलाईनच्या कामामुळे वारंवार पिण्याची पाईपलाईन फुटत आहे. तसेच विजेचा लपंडाव सुरू असल्याने पाणीपुरवठा सुरळीत करण्यास अडचण निर्माण होत आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा. गॅसच्या पाइपलाइनच्या ठेकेदारावर कारवाई करणे गरजेचे आहे.

.....सौ. राजश्री मगर (सरपंच जेऊर)

_______________________________________


'त्या' ठेकेदाराला आशीर्वाद कोणाचा?

नगर-औरंगाबाद महामार्गावर गॅस पाईपलाईन च्या कामामुळे अनेक शेतकरी, व्यावसायिक यांचे नुकसान झाले आहे. तसेच अपघातात अनेकांचे बळी गेले तर काहींना अपंगत्व आले आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. मनमानी पद्धतीने सुरू असलेल्या कामकाजाबद्दल अनेक तक्रारी येऊन देखील त्याच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे त्या ठेकेदारांवर आशीर्वाद कोणाचा? असा सवाल जेऊर ग्रामस्थांमधुन व्यक्त होत आहे.

___________________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post