माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - भर उन्हाळ्यात निम्म्या महाराष्ट्राला पावसाळ्याची अनुभती येत आहे तर रात्रीतून वातावरणात बदल घडून येत आहे. कालपर्यंत मराठवाड्यात असह्य उन्हाच्या झळा होत्या तर रविवारी पहाटेपासूनच ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसाला सुरवात झाली होती. त्यामुळे निसर्गाचा लहरीपणा काय असतो याची प्रचिती येऊ लागली आहे. टप्प्याटप्प्याने का होईना अवकाळी पावसाने राज्याला वेढा दिला आहे. तर अवकाळीची अवकृपा संपली की उन्हाच्या झळा काय असतात याची प्रचिती येऊ लागली आहे. आणखीन 5 दिवस अशा परस्थितीचा सामना करावा लागणार आहे. आता पुढील 5 दिवस काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पुढील 5 दिवस कशी राहणार स्थिती?
रबी हंगामातील पिकांची काढणी अंतिम टप्प्यात असताना होत असलेल्या वातावरणातील बदलाचा परिणाम हा उत्पादनावर होणार आहे. मात्र, अनेक भागात मुख्य पिकांची काढणी कामे ही उरकलेली आहेत. असे असतानाच हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज आता प्रत्यक्षात खरा ठरत आहे. त्यामुळे रविवारी मराठवाडा, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र या भागात तुरळक ठिकाणी पावसाला सुरवात झाली होती. तर विदर्भात कोरडे वातावरण होते. मात्र, 25, 26 आणि 27 एप्रिल रोजी कोकण, गोवा, मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. शिवाय विजांचा कडकडाट होईलही असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे.
राज्याच्या राजधानीत मात्र पारा चढला
राज्यातील विविध भागात ढगाळ वातावरण आणि पाऊस असला तरी मुंबईत मात्र, उन्हाचा पारा हा वाढतच आहे. गेल्या 3 दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा हा 37 अंश सेल्सिअसवर आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ झाली असून मुंबईकरांच्या अंगाची लाही-लाही होत आहे. उकाड्यामध्ये वाढ झाली असून नागरिकांना रस्त्यावरुन मार्गस्थ होत असताना उन्हाच्या झळा ह्या असह्य होत आहेत.
या राज्यांमध्ये उष्णतेची लाट
महाराष्ट्रात ऊन-पावसाचा खेळ असला तरी इतर राज्यांमध्ये मात्र, उष्णतेची लाट निर्माण होणार आहे. पुढील पाच दिवस गुजरात, दक्षिण उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, ओरिसा, राज्यस्थान, हरियाना आणि विदर्भात उन्हामध्ये वाढ होणार आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम शेती पिकावर तर होतच आहे पण आता नागरिकांच्या आरोग्यावर तो जाणवू लागला आहे.
Post a Comment