उद्धव, राज, देवेंद्र फडणवीस यांच्या तोफा धडाडणार
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - येत्या महाराष्ट्र दिनी (1मे) एकाच दिवशी राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे व भाजप नेते देवेंद्र फडणवीस या 3 महत्वाच्या नेत्यांच्या प्रचार तोफा धडाडणार आहेत. उद्धव पुण्यात जाहीर सभा घेणार आहेत. तर राज ठाकरे यांची तोफ औरंगाबादेत धडाडणार आहे. याचवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुंबईतील एका जाहीर सभेद्वारे सत्ताधाऱ्यांची पिसे काढण्याची शक्यता आहे. राज्यात लवकरच मुंबईसह 18 महापालिकांच्या निवडणुकीचा फड रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर या पक्षांनी या सभांद्वारे वातावरण निर्मिती करण्याचा घाट घातला आहे. यासाठी त्यांनी महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधल्याने राज्याचे वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना राज ठाकरेंचा उल्लेख 'नवहिंदू' म्हणून केला होता. त्यावेळी त्यांनी राज यांचा समाचार एका जाहीर सभेतून घेण्याचे सूतोवाच करत भाजप नेत्यांवरही तोंडसूख घेतले होते. त्यानंतर भाजप नेत्यांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुणावर निशाणा साधणार? याकडे अवघ्या राज्याचे लक्ष्य लागले आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे 1 मे रोजी मुंबईत शक्तिप्रदर्शन करणार आहेत. यावेळी ते मुंबई मनपाच्या घोटाळ्यावरून शिवसेनेला घेरतील, असा अंदाज आहे. यात ते प्रामुख्याने शिवसेनेचे उपनेते आणि स्थायी समीतीचे सभापती यशवंत जाधव यांच्या घोटाळ्यांवरुन शिवसेनेला टार्गेट करतील अशी शक्यता आहे. भाजपची सध्या ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराची पोलखोल यात्रा सुरू आहे. त्यामुळे फडणवीस मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यापुढे ठेऊन राज्य सरकारला घेरतील यात शंका नाही.
राज ठाकरेंची 1 मे रोजी औरंगाबादेत सभा आहे. ठाण्यातील सभेत राज ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. यानंतर राष्ट्रवादीकडून राज ठाकरेंना प्रत्युत्तरही देण्यात आले होते. यावरून राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे दोनदा कौतुक केले आहे. योगी चांगले काम करत असल्याचे ते जाहीर सभांतून म्हणालेत. तसेच एका पत्राद्वारे त्यांनी भोंग्याच्या मुद्यावर योगींनी घेतलेल्या भूमिकेचेही कौतुक केले आहे. विशेषतः राज्य सरकाला या प्रकरणी सदबुद्धी मिळावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यातच औरंगाबदच्या सभेआधी टिझर रिलीज करण्यात आला आहे. त्यावरुन राज ठाकरे औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरुन शिवसेनेला टार्गेट करणार असल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे आता त्यांच्या 1 मेच्या सभेकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
गत अनेक वर्षांपासून मुंबई व औरंगाबाद मनपात शिवसेनेची सत्ता आहे. यामुळे हे शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत, असे मानले जाते. या मनपातील शिवसेनेच्या सत्तेला सुरूंग लावण्याची रणनीती भाजप आणि मनसेकडून आखण्यात आली आहे का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज ठाकरेंनी औरंगाबादेत तर देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत शक्तिप्रदर्शन करण्यासाठी जाहीर सभांचे आयोजन केले आहे. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मनसेच्या सभेसाठी भाजप घरोघरी जाऊन निमंत्रण देत असल्याचा आरोप केला आहे. यावेळी बोलताना खैरेंनी सभेला गर्दी होणार नाही, असे म्हणत मनसेला डिवचले आहे. त्यावर राज ठाकरेंच्या सभेसाठी पोलिस परवानगीची गरज नाही असे भाजपच्या नेत्यांनी वक्तव्य केल्याने अनेक चर्चा रंगल्या आहेत.
Post a Comment