मंत्री गडाख पिता-पुत्रास जीवे मारण्याचा कट; समर्थकांनी उचलले मोठे पाऊल

 


माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर -राज्याचे मृद व जलसंधारण मंञी शंकरराव गडाख व त्यांचे चिरंजीव उदयन गडाख यांना जीवे ठार मारण्यासाठी कट रचल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियातून व्हायरल झाल्याने गडाखांचे नेवाशातील कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. मंत्री गडाखांविरुद्ध कट कारस्थान रचणाऱ्याला त्वरीत अटक करा, अशी मागणी केली आहे. यासाठी आज नेवासा शहरासह तालुका बंद ठेवण्याचे लेखी निवेदन मंञी गडाख समर्थकांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा व नेवासा पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाजीराव पोवार यांना दिले.

चार दिवसांपूर्वी मंञी गडाख यांचे स्वीय सहायक राहुल राजळे यांच्यावर लोहगांव (ता.नेवासा) येथे हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार करुन जखमी केले. आता मंत्री गडाख व उदयन गडाख यांना ठार मारण्यासाठी कट कारस्थानाची ऑडिओ क्लिप पुढे आली आहे. "आम्ही फक्त वाट पाहून आहोत, घरात जावून ठोकू", अशा आशयाचे संभाषण क्लिपमध्ये आहे. त्यामुळे मंत्री गडाख यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. 


या कट कारस्थानामागील सूत्रधार शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नेवासा तालुका बंद ठेवण्याची हाक मंञी गडाख समर्थकांनी दिली. निवेदनावर नेवासा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, गफ्फुर बागवान, इम्रान दारुवाले, नितीन मिरपगार, बाळासाहेब कोकणे व दिगंबर लष्करे यांच्या सह्या आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post