शेतकऱ्यांची आर्त हाक ; प्रशासन व पदाधिकाऱ्यांची चुप्पी
माय अहमदनगर वेब टीम-
- शेकडो झाडांची कत्तल... अनेकांचे अपघातात गेले प्राण.....शेतकरी व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान.....मोठमोठाल्या फळ झाडांची कत्तल..... अशा वास्तव परिस्थितीत नगर-औरंगाबाद महामार्गालगत गॅसच्या पाईपलाईनचे काम सुरूच आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर औरंगाबाद महामार्गालगत सुरू असलेल्या गॅस पाईपलाईनच्या कामाला शेतकरी, व्यावसायिक, नागरिक वैतागले असून हतबल होऊन या मनमानी कामाकडे कोणी लक्ष देणार आहे की नाही असा संतप्त सवाल करत आहेत.
गॅसच्या पाईपलाईन साठी शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली. विद्युत वाहिन्या शिफ्ट करण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांमधून तसेच व्यावसायिकांचे मोठे नुकसान करत गॅसच्या पाईपलाईनचे काम सुरूच आहे. शेतकऱ्यांना शेतातील विद्युत वाहिनीचा एक पोल शिफ्ट करायचा असल्यास वारंवार विनंती अर्ज करून देखील महावितरण कंपनीकडून परवानगी मिळत नाही. शेकडो झाडांच्या कत्तली बाबतीतही तीच परिस्थिती आहे. यामध्ये प्रशासन व सर्वच पक्षाचे पदाधिकारी गप्प का ? यामागचे गौडबंगाल काय याबाबत परिसरात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.
जेऊर परिसरात संबंधित ठेकेदाराने अनेक व्यावसायिकांसमोर चर खोदून सुमारे दोन-तीन महिने आहे त्याच स्थितीत ठेवल्याने व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. संबंधित ठेकेदार मनमानी काम करत असून वाहने रस्त्याच्या मधोमध उभे करून काम केले जाते. अथवा एकेरी वाहतूक करण्यात येते त्यामुळे घडलेल्या अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे.
जेऊर परिसरातील शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीला विरोध करण्याचा प्रयत्न केला पण संघटित विरोध झाला नाही. जो तो शेतकरी संबंधित ठेकेदाराशी वैयक्तिक वाद घालत होता. तसेच या भागातील कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांनी शेतकरी तसेच व्यावसायिकांचे नुकसान होऊन देखील साथ दिली नाही हे दुर्दैव आहे. नगर दौंड रस्त्या बाबत जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी आक्रमक होत शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून काम बंद पाडले होते. परंतु नगर-औरंगाबाद महामार्गावर संबंधित ठेकेदाराची मनमानी सुरू असून देखील त्या विरोधात कोणी आवाज उठवत नसल्याने त्या ठेकेदाराचे फावत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
तरी संबंधित ठेकेदाराची मनमानी कारभाराविरोधात पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली असून प्रशासनाने तात्काळ दखल घेत शेतकऱ्यांच्या व व्यावसायिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई संबंधित कंपनीकडून वसूल करावी. अन्यथा काम करू देण्यात येणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.
शेतकरी व्यावसायिक एकत्रित करणार विरोध
जेऊर परिसरातील शेतकरी, व्यावसायिक एकत्र येऊन संबंधित कंपनीशी विरोध करणार असल्याची माहिती मिळत आहे. आमचे नुकसान होऊन देखील ठेकेदाराची अरेरावी सहन करायची का ? असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
जेऊर परिसरात काम बंद पाडणार
जेऊर परिसरात अनेक शेतकरी व व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संबंधित ठेकेदाराने काम करताना सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानी पद्धतीने काम केल्याचा आरोप परिसरातून होत आहे. त्यामुळे परिसरात कोणत्याही परिस्थितीत संबंधित ठेकेदाराला काम करू देणार नाही असा पवित्रा शेतकरी व व्यावसायिकांनी घेतलेला आहे.
नुकसान करण्याची परवानगी दिली आहे काय
संबंधित ठेकेदारास विरोध केला असता आमच्याकडे परवानगी असल्याचे सांगण्यात येते. पाईपलाईनचे काम करताना शेतकरी व व्यावसायिकांचे मनमानी पद्धतीने नुकसान करण्याची परवानगी दिली आहे काय असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे. याबाबत प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून शेतकरी तसेच व्यवसायिकांना न्याय देण्याची मागणी करण्यात येत आहे.
Post a Comment