माय अहमदनगर वेब टीम
गोविंद मोकाटे यांना जिरवा जिरवीच्या राजकारणाचा फटका बसला
नगर तालुका- नगर तालुक्यातील विकृत राजकारण्यांना आगामी निवडणुकांमध्ये जनता धडा शिकविणार असल्याचा विश्वास ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला.
ससेवाडी येथील नवनिर्वाचित सोसायटी सदस्यांचा सत्कार सोहळा नामदार तनपुरे यांच्या हस्ते संदेश कार्ले, शरद झोडगे, उद्धवराव दुसुंगे, अंकुश शेळके, प्रा. सिताराम काकडे, रघुनाथ झिने, सरपंच रामेश्वर निमसे, तालुका अध्यक्ष राजेंद्र भगत, भास्कर मगर, दत्तात्रय डोकडे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.
त्याप्रसंगी बोलताना ना. तनपुरे यांनी सांगितले की, नगर तालुक्यात खूप विकृत राजकारण सुरू आहे. अशा लोकांना राजकारणातून जनतेने बाजूला सारले तरी खुनशी चे राजकारण, जिरवा जिरवा चे राजकारण सुरू असून अशा विकृत राजकारण करणा-यांना आगामी निवडणुकीत जनता धडा शिकविणार असा विश्वास तनपुरे यांनी व्यक्त केला.
माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांना अनेक अडचणी, जिरवा जिरवीच्या राजकारणाचा फटका बसला असून त्यांनी गटामध्ये केलेली विकास कामे कौतुकास्पद आहेत. मी राजकारणात खुन्नस ठेवत नाही. विकास कामाकडे लक्ष देतो.
यावेळी तनपुरे यांनी नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजावर सडकून टीका केली. महानगरपालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसवून कामकाज करण्यात आले आहे. बाजार समितीचे राज्यात नावलौकिक होणे गरजेचे असताना नाव घालविण्याचे काम यांनी केले, अशी टीका तनपुरे यांनी केली. त्यामुळे आता बाजारसमिती चांगल्या लोकांच्या हातात देऊन परिवर्तन घडवावे.
पिंपळगाव माळवी येथे नवीन सब स्टेशन झाल्यानंतर जेऊर सबस्टेशनचा लोड कमी होणार आहे. तसेच बुऱ्हाणनगर पाणी योजनेचे पाणी नेमके जाते कुठे ? असा सवालही तनपुरे यांनी उपस्थित केला. मी तालुक्यात जास्तीत जास्त विकास कामे करणार असून ससेवाडी येथील रस्ते व स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन तनपुरे यांनी दिले. तसेच परिसरातील चार-पाच गावांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यावर लवकरच मार्ग काढण्यात येणार असल्याचे तनपुरे यांनी सांगितले. याप्रसंगी ससेवाडी चे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
_____________________________
मंत्र्यांकडून पाणीटंचाईची तात्काळ दखल
ससेवाडी ग्रामस्थांकडून गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तात्काळ ना. प्राजक्त तनपुरे यांनी तहसीलदार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत लवकरात लवकर टॅंकर सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे नामदार तनपुरे यांच्या कार्याचे कौतुक ससेवाडी ग्रामस्थांमधून करण्यात आले.
_________________________________