पिंपळगाव तलाव पाटबंधारे खात्याकडे वर्ग होणार ?

 

 माय अहमदनगर वेब टीम


पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये समाधान ; नामदार तनपुरे यांचे आश्वासन 

नगर तालुका - नगर तालुक्यातील पिंपळगाव तलाव पाटबंधारे विभागाकडे वर्ग करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे नगरविकास मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. त्यामुळे जेऊर पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले आहे.

      याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपळगाव माळवी तलावातून पूर्वी नगर शहराला पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन होती. परंतु मुळा धरणाचे पाणी नगर शहरासाठी आणण्यात आल्याने पिंपळगाव तलावातुन असणारी पाईपलाईन बंद पडली सदरच्या तलावाचे क्षेत्र शिंदे सरकार या नावाने सातबारावर नोंद होती. महादजी शिंदे सरकारच्या काळापासून येथे वास्तव्यास असणाऱ्या आदिवासी भिल्ल समाजाने या जागेवर आपला हक्क सांगितला होता. सदर जागेचा प्रश्न न्यायालयात तसेच अनुसूचित जनजाति आयोगाकडे दाखल होता.

      येथील आदिवासी समाज सदर क्षेत्रावर आपल्या नावाची नोंद व्हावी म्हणून अनेक वर्षे शासन दरबारी लढाई लढत होता. परंतु सदर क्षेत्रावर महानगरपालिकेच्या नावाची नोंद करण्यात आली आहे. सुमारे ७०० एकर क्षेत्र असणाऱ्या या तलावाचा परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेतीसाठी उपयोग व्हावा या दृष्टीने तलाव पाटबंधारे विभागाकडे वर्ग करण्याची मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून करण्यात आली. आता महानगरपालिकेला सदर तलावाचा उपयोग नाही. त्यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या, शेतकरी यांच्या हितासाठी तलाव पाटबंधारे खात्याकडे वर्ग करण्यात यावा. अशी मागणी नगर विकास मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे करण्यात आली.

      त्यावर बोलताना तनपुरे यांनी स्पष्ट भूमिका घेऊन सांगितले की सरकार लोकांसाठी असते. आणि लोकांना काय हवे याचा विचार करून परिसरातील सर्व गावांनी ठराव दिल्यास त्याचा प्रस्ताव तयार करून पिंपळगाव तलाव पाटबंधारे विभागाकडे वर्ग करण्यासाठी निश्चित प्रयत्न करू. योगायोगाने माझ्याकडे नगरविकास खाते आहे तर मामा जयंत पाटील यांच्याकडे पाटबंधारे खाते असल्याने तलावाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल.

      जेऊर, धनगरवाडी, पिंपळगाव, डोंगरगण, मांजरसुंबा हे गावे तसा ठराव देणार असल्याने या परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीसाठी देखील तलावातील पाण्याचा उपयोग होणार आहे. तसेच इमामपुर, बहिरवाडी, ससेवाडी या गावांना देखील येथील तलावाच्या पाण्याचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

______________


 आदिवासी समाजाचे भवितव्य अधांतरी

 पिंपळगाव तलावाच्या कडेला आदिवासी भिल्ल समाजाची सुमारे दोनशे ते अडीचशे कुटुंब अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. मासेमारी व तेथील शेती करून ते आपली उपजीविका भागवत आहेत. आदिवासी खाते ही नामदार तनपुरे यांच्याकडे असल्याने त्यांच्याबाबत तनपुरे काय भूमिका घेणार याकडे आदिवासी समाजाचे लक्ष लागून आहे.

__________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post