सरपंच परिषदेच्या वतीने देण्यात येणार विविध पुरस्कार

माय अहमदनगर वेब टीम 

 हिवरे बाजार येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन

 नगर तालुका-- सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रच्या वतीने राज्यातील लोकप्रतिनिधी, सरपंच, ग्रामसेवक, प्रशासकीय अधिकारी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

     ज्यांनी समाज हिताच्या प्रश्नावर कार्य केलेले आहे अशा व्यक्तिंना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. विधानसभा व विधान परिषदेत गावचे प्रश्न, सरपंचाच्या समस्या मांडून न्याय मिळवून देण्याचे काम केले. त्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री आमदार सुरेश धस, आमदार प्रशांत बंब, आमदार निलेश लंके यांना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

     प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अंमलबजावणी संचालनालय मुंबईचे सह आयुक्त उज्वल चव्हाण तसेच जे.डी.ए. कृषी विभाग पुणे येथील रफीक नाईकवडी यांना उत्तम प्रशासक म्हणून पुरस्कार देण्यात येणार आहे.

     याचबरोबर राज्यातील दहा सरपंच यांना आदर्श सरपंच व पाच ग्रामपंचायतींना आदर्श ग्रामपंचायत, पाच ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक तसेच पाच समाज सेवा करणा-यांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. 

       पुरस्कार वितरण हे शुक्रवार दि. २२ एप्रिल रोजी हिवरे बाजार येथे विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते पद्मश्री पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

     पत्रकार परिषदेसाठी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, प्रदेश सरचिटणीस ॲड. विकास जाधव, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब सोनवणे, जिल्हा समन्वयक अंजना येवले, ज्ञानेश्वर पठारे, नानासाहेब ठोंबरे उपस्थित होते.

----------------------------------------


गावच्या समस्यांसाठी झगडणारी अराजकीय परिषद

सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य ही अराजकीय असून कोणत्याही पक्षाशी बांधील नाही. सरपंच व गावच्या समस्या शासनदरबारी मांडण्यासाठी सातत्याने झगडणारी ही परिषद आहे. परिषदेमध्ये सर्व पक्षांचे सरपंच असले तरी परिषद मात्र पुर्णपणे अराजकीय असुन गावच्या तसेच सरपंचांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे.

...... दत्ता काकडे (प्रदेशाध्यक्ष सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र)

_________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post