घरकुल प्रकरणात गाव पुढाऱ्यांचा संबंध नसतो
माजी उपसरपंच शंकर बळे यांची स्पष्टीकरण
माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका- नगर तालुक्यातील ससेवाडी येथील घरकुल प्रकरणाचा विषय चांगलाच गाजत असून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. त्याबाबत माजी उपसरपंच शंकर बळे यांनी खुलासा करून घरकुल प्रकरणात गावातील पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप होत नसल्याचे स्पष्टीकरण केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ससेवाडी गावातून घरकुल प्रकरणासाठी पंचायत समितीकडे एकूण ८९ प्रकरणे पाठविण्यात आली होती. त्यातील ६४ प्रकरणे अपात्र करण्यात आली आहेत. तर २५ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे. अपात्र करण्यात आलेल्या प्रकरणावरून गावांमध्ये चांगलेच राजकारण तापले आहे. आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
माजी उपसरपंच शंकर बळे यांनी याबाबत स्पष्टीकरण करताना सांगितले की, घरकुल प्रकरण मंजूर अथवा नामंजूर करण्यासाठी शासकीय पातळीवरून सर्व्हे करण्यात येतो. पंचायत समिती स्तरावरुन घरकुल पात्र-अपात्र करण्यासाठी निकष लावण्यात आलेले आहेत. त्यामध्ये गावपातळीवरील कोणत्याही पदाधिकारी अथवा गाव पुढाऱ्याचा हस्तक्षेप होत नाही.
घरातील व्यक्तीच्या नावावर चारचाकी वाहने, किसान क्रेडिट कार्ड मर्यादा, सरकारी नोकरी, कृषी उपकरणे, उत्पन्न, प्राप्तिकर भरणे, व्यावसायिक कर भरणे, बागायत क्षेत्र, सिंचन क्षेत्र, एकूण क्षेत्र अशा विविध बाबींचा विचार करून घरकुल मंजूर अथवा नामंजूर केले जातात. त्यासाठी शासन पातळीवरुन टिम सर्व्हे करत असतात. त्यामुळे घरकुल प्रकरणात गावातील कोणावरही आरोप करणे हे चुकीचे आहे.
गावातील राजकारणात विरोधक जाणून बुजून घरकुल अपात्र करण्याबाबत अफवा पसरवत आहेत. तरी ससेवाडी येथील सर्व ग्रामस्थांना घरकुल प्रकरणात राजकारण न करता ते प्रशासकीय पातळीवरून निवड होत असते. त्यामुळे चुकीचे सोशल मीडिया व्हाट्सअप द्वारे कोणावरही आरोप करून बदनामी करू नये असे आवाहन माजी उपसरपंच शंकर बळे यांनी केले आहे.
___________________________
पंचायत समितीकडून खात्री करा
ज्या नागरिकांचे घरकुल अपात्र झाली आहेत. अशा नागरिकांनी गावातील राजकारण्यांवर विश्वास न ठेवता स्वतः पंचायत समितीमध्ये जाऊन घरकुल अपात्र का झाले याबाबतची खात्री करावी. कोणाच्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
... शंकर बळे (माजी उपसरपंच ससेवाडी)
______________________________
Post a Comment