माय अहमदनगर वेब टीम
ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर शुक्रवारी दुपारी जमावाने चालून जात हल्ला केला होता. हा हल्ला आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी केल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी यामागे मोठे कारस्थान असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच पोलीस त्यादिशेन तपास करत असून पवारांच्या घराजवळील सीसीटीव्ही फुटेजमधून महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याचे सांगण्यात येत आहे.
शरद पवार यांच्या घरावर शुक्रवारी दुपारी अचानक हल्ला झाला होता. मोठा जमाव चालून आला आणि त्यांनी घराच्या गेटमधून आत शिरत पवार यांच्याविरोधात घोषणा दिल्या. यावेळी दगडफेक आणि चप्पलफेकही करण्यात आली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर स्थिती नियंत्रणात आली. या संपूर्ण घटनेने मोठी खळबळ उडाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेची गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानंतर तपासाला वेग आला असून एसटी कामगारांची बाजू कोर्टात मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते तसेच अन्य १०९ जणांना अटक करण्यात आली आहे. या हल्ल्याला नेमकी कुणाची चिथावणी होती?, हा हल्ला पूर्वनियोजित होता का?, हे तपासातील महत्त्वाचे मुद्दे असून त्यादिशेने पोलिसांचा तपास सुरू झाला आहे.
शरद पवार यांच्या घरावर आंदोलन करण्याआधी या भागाची रेकी करण्यात आली होती, असा पोलिसांचा संशय आहे. पोलिसांनी सिल्व्हर ओक येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. त्यात घटनेच्या आधीपासूनच या भागात काही व्यक्ती संशयास्पदरित्या हालचाली करत होत्या, असे दिसून आले आहे. पोलिसांनी ज्या १०९ जणांना अटक केली आहे. त्यापैकी काही व्यक्ती सीसीटीव्हीत दिसत असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्याचवेळी मोठ्या प्रमाणात आंदोलक आझाद मैदानात होते. तेथील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात असून पवारांच्या घरावर हल्ला करणारे नेमके एसटी कर्मचारीच होते की अन्य कुणी, याचाही पोलीस शोध घेत आहेत.
दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर आजही माध्यमांकडे प्रतिक्रिया दिली. या घटनेची चौकशी पोलीस करत आहेत. त्यातून नेमके सत्य काय आहे ते समोर येईलच, असे वळसे म्हणाले. एसटी कामगारांनी शांतता राखावी. टोकाची भूमिका घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.
Post a Comment