स.पो.नि. युवराज आठरे यांची यशस्वी मध्यस्थी
जेऊर- नगर तालुक्यातील जेऊर येथील झेंडा वादावर पडदा टाकण्याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांची मध्यस्थी यशस्वी ठरली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर गावामध्ये गेल्या आठ दिवसांपासून झेंड्यावरुन वातावरण चांगलेच तापले होते. जेऊर गावात जाणाऱ्या रस्त्यालगत झेंडा लावण्याच्या कारणातून अंतर्गत धुसफूस सुरू होती. याची माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनला देण्यात आल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे व मंडळाधिकारी वृषाली करोसिया यांनी दोन्ही समाजाची बैठक घेऊन यशस्वी मध्यस्थी केली.
सदर प्रकरण चांगलेच चिघळणार असे वातावरण गावामध्ये तयार झाले होते. ग्रामपंचायत कार्यालयाकडून झेंडा लावण्याबाबत ना हारकत घेण्यात आल्यानंतर सदर जागा सरकारची येत असल्याने त्यास परवानगी देण्यात येऊ नये असा अर्ज गावातील विविध मंडळाकडून देण्यात आला होता. त्यामुळे प्रकरण चांगलेच चिघळले होते.
सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे, मंडळाधिकारी वृषाली करोसिया व दोन्ही समाजाचे प्रतिनिधी यांच्यात झालेल्या बैठकीत गावामध्ये कृती समिती स्थापन करण्यात येणार आहे. तसेच ग्रामपंचायत च्या वतीने तात्काळ शासकीय जागांची मोजणी करून हद्द निश्चित करण्याचे ठरले. दोन्ही समाजाचे झेंडे उभारण्यात येणार आहेत.
गावात जातीय सलोखा राखण्यासाठी गाव पातळीवर चर्चा करून निर्णय घ्या. सर्व जाती धर्माच्या लोकांनी एक विचाराने राहा. जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याचा इशारा युवराज आठरे यांनी दिला आहे.
जेऊर गावात दोन्ही समाजाचे झेंडे उभारण्यात येणार आहेत. तसेच गावातील सर्व जातीधर्माच्या नागरिकांनी सर्व महान पुरुष व झेंड्यांचा आदर राखण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जेऊर गावात कोणताही जातीभेद नसून ऐक्याचे दर्शन घडविण्याचा निर्णय तरुणांनी घेतला आहे.
_________________________
जाती-जातीत तेढ निर्माण करणाऱ्यांना धडा शिकवा.
गावात अठरापगड जातींचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. परंतु काहीजण गावात स्वतःचे राजकीय अस्तित्व दाखवण्यासाठी तसेच स्वतःला चाणाक्ष समजत जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा उद्योग करत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांकडून करण्यात आला. त्यांना धडा शिकवा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
______________________
जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालण्याची गरज
नगर तालुक्यात झेंडे लावण्याचे फॅड गावागावात पसरले असून यावरून गावामध्ये जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस प्रमुख यांनी जातीने लक्ष घालण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
_______________________
Post a Comment