माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका- नगर तालुक्यात काही गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असून ससेवाडी बहिरवाडी इमामपूर येथील टँकर प्रस्ताव मंजूर असूनही पंचायत समिती प्रशासनाकडे डिझेल साठी पैसे नसल्यामुळे सदर गावांमध्ये टॅंकर सुरू झालेले नव्हते. परिणामी नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्या अनुषंगाने आंदोलनाचा इशारा दिला असता जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी महाविकास आघाडीचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी माजी मंत्री कर्डिले यांच्यावर टीका केली आहे. असा आरोप भाजप तालुका उपाध्यक्ष राजू दारकुंडे यांनी केला आहे.
वास्तविक गेली १५ वर्ष पंचायत समितीवर महा विकास आघाडीची सत्ता आहे. महा विकास आघाडीचे प्रमुख नेते तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती च्या माध्यमातून विविध पदांवर आहेत त्यांनी या पदांवर असताना काय कार्य केले हे संपूर्ण तालुक्याला माहित आहे. सत्तेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या बदल्या, रस्त्यांची बंधाऱ्यांची कामे यात अमाप दलाली खाणे, गोरगरीब जनतेला वेठीस धरून त्यांच्या वैयक्तिक कामातही पैसे हडपणे, स्वतःच्या मर्जीतील ठेकेदारांकडून कामे करून त्या माध्यमातून पैसा उकळणे यातूनच स्वतःचे उखळ पांढरे करून घेणे असा उद्योग यांनी केला असल्याचे दारकुंडे यांनी सांगितले..
आता राज्यात महा विकास आघाडीचे सरकार आहे जनतेच्या वीज पाणी रस्ते या मूलभूत प्रश्नांवर हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे टँकर प्रस्ताव मंजूर असताना प्रशासनाकडे डिझेल साठी पैसा नसावा ही बाब झाकण्यासाठी जि प सदस्य संदेश कार्ले माजीमंत्री कर्डिले यांच्यावर टीका करत आहेत.
माजीमंत्री कर्डिले साहेब यांच्या काळात अशा प्रकारची परिस्थिती कधीच उद्भवली नव्हती भयंकर दुष्काळातही चारा छावणी पाण्याचे टॅंकर यांच्या माध्यमातून त्यांनी पशुधनास बरोबरच जनतेला ही दिलासा दिलेला आहे ही गोष्ट सर्वसामान्य जनता कधीच विसरू शकत नाही
आता मात्र जिल्ह्यात तीन मंत्री महत्त्वाच्या पदावर असतानाही जनतेला पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.
वास्तविक नगर तालुक्यातील महाआघाडीच्या सर्व पुढाऱ्यांचे राजकारणच माजी मंत्री कर्डिलेंवर टीका करण्यावर अवलंबुन आहे. त्यामुळेच सध्या चालू असलेल्या सोसायटी निवडणुकांमध्ये जनतेने त्यांना जागा दाखवून दिलेली आहे.
टँकर घोटाळ्यामध्ये माजी मंत्री कर्डिलेंवर आरोप करण्यात आले आहेत राज्यात आता तुमचे सरकार आहे त्या आरोपांची चौकशी करा आणि त्यातील सत्य बाहेर आल्यावर टीका करा. तुमच्याही पंधरा वर्षाच्या कारकिर्दीची चौकशी करा त्यातून काय बाहेर निघते ते पहा. स्वतःचे पाप झाकण्यासाठी कर्डिलेवर टीका करू नका अन्यथा आम्हालाही तुमच्यावर बोलता येते असा इशारा नगर तालुका भाजपाने दिला आहे.
_____________________
Post a Comment