माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका-- नगर-औरंगाबाद महामार्गावरील गॅस पाईपलाईनच्या कामाने शेतकरी, व्यवसायिक, नागरिक अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. त्या विरोधात अनेक वेळा आवाज उठवून देखील कोणीही लक्ष देत नसल्याने जेऊर पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
इमामपूर येथील महेश राधाकिसन आवारे यांनी सोसायटीचे कर्ज काढून औरंगाबाद महामार्गावर उसाच्या रसाचे दुकान टाकले होते. गॅस पाईपलाईनचे काम करणाऱ्यांनी दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असल्याची माहिती महेश आवारे यांनी दिली. सोसायटीचे कर्ज काढून उभारलेल्या व्यवसायाचे गॅस पाईपलाईनच्या कामामुळे सारे होत्याचे नव्हते झाले असून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे आवारे यांनी सांगितले. इमामपूर परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे.
नगर-औरंगाबाद महामार्गावर गॅस पाईपलाईन चे काम सुरू असून काम संपूर्णतः मनमानी पद्धतीने सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. काम करताना शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांमध्ये चर खोदण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून काम सुरू आहे. अनेक व्यावसायिकांसमोर कित्येक दिवस चर खोदून आहे त्या अवस्थेत ठेवण्यात आल्याने व्यावसायिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन वर्ष कोरोनाचे संकट अन् आता गॅस पाईप लाईन मुळे व्यावसायिक वैतागले आहेत.
शेतकऱ्यांची मोठ-मोठाली फळ झाडे तोडण्यात आली. एकेरी वाहतूक तसेच गॅस पाईपलाईन च्या कामासाठी रस्त्यावर लावण्यात येणाऱ्या वाहनांमुळे अनेक अपघात घडले आहेत. संबंधित ठेकेदाराची मनमानी सुरू असून त्या विरोधात शेतकरी, व्यावसायिक यांचा आक्रोश निर्माण झाला आहे.
जेऊर परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ यांनी तीव्र विरोध केल्यानंतर येथील काम बंद ठेवून संबंधित ठेकेदाराने इतरत्र काम करून घेतले आहे. आता जेऊर परिसरात कामाला सुरुवात करण्यात आली आहे परंतु कोणत्याही परिस्थितीत काम करू देणार नाही. असा पवित्रा येथील नागरिकांनी घेतला आहे. अगोदर शेतकरी, व्यावसायिकांचे झालेली नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
______________________
गुन्हा दाखल करणार?
उसाचा चरखा, शेड, कापड यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे. कर्ज, उसनवारी करून ऊभारलेल्या धंद्याचे गॅस पाईपलाईन च्या कामामुळे संपूर्णत: नुकसान झाले आहे. कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येणार आहे. सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान करण्यात आले असून त्या विरोधात पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
..... महेश राधाकिसन आवारे (इमामपूर व्यवसायिक)
__________________________
प्रशासन व पदाधिकारी गप्प का ?
नगर-औरंगाबाद महामार्गावरील गॅस पाईप लाईन मुळे शेतकरी, व्यवसायिक यांचे एवढे नुकसान झाले आहे. संबंधित ठेकेदाराची मनमानी सुरू आहे. त्याबाबत प्रशासन तसेच पदाधिकारी गप्प का याचे गौडबंगाल काय असा सवाल ननागरिकांकडून करण्यात येत आहे. शेतकरी, व्यावसायिक, नागरिकांचे नुकसान करण्याची यांना परवानगी देण्यात आली आहे काय? कोणत्याही परिस्थितीत काम करू देणार नाही. अशी भूमिका जेऊर परिसरातील नागरिकांनी घेतलेली आहे. वेळप्रसंगी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.
________________________________
Post a Comment