माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका-- नगर तालुक्यातील इमामपूर गावचे सरपंच भिमराज मोकाटे यांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणाला वैतागून सरपंच पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गावात सद्यस्थितीत तीव्र पाणीटंचाई आहे. ग्रामपंचायतच्या वतीने प्रशासनाकडे टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार इमामपूर गावासाठी टॅंकरला प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. परंतु प्रशासनाकडून टँकरच्या डिझेलच्या खर्चासाठी निधीची तरतूद नसल्याचे कारण पुढे करत अद्याप टँकर सुरू करण्यात आलेले नाहीत.
इमामपूर गावासाठी कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. आज इमामपूर ग्रामस्थ हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. महिला, लहान मुलांची दिवसभर पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे. प्रशासनाचे नियोजन नसल्याने गावातील नागरिकांचे अतोनात हाल सुरू आहेत.
गावचा सरपंच म्हणून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. मी ग्रामपंचायतच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. इमामपूर प्रमाणे बहिरवाडी, ससेवाडी या गावातील ग्रामस्थ तसेच वाड्या वस्त्यांवरील जनतेला वेठीस धरण्याचे काम प्रशासनाकडून सुरू असल्याचा आरोप भिमराज मोकाटे यांच्याकडून करण्यात आला.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जेऊर परिसरामध्ये पाण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. सर्वसामान्य जनता पाण्यासाठी त्राही त्राही करत असताना सरपंच पदावर राहणे योग्य नाही. प्रशासनाचा निषेध करत राजीनामा देण्यात येणार असल्याची माहिती सरपंच भिमराज मोकाटे यांनी दिली.
______________________________________________
सत्ताधारी पक्षातील सरपंच मोकाटे
इमामपूर ग्रामपंचायत मध्ये महाविकास आघाडी सरकारची सत्ता आहे. राज्यातही महाविकास आघाडीचे सरकार आहे. तरीदेखील पाण्याच्या प्रश्नावर प्रशासन निष्काळजीपणा करत असल्याचा आरोप करत सरपंच पदाचा राजीनामा देणार असल्याचे भिमराज मोकाटे यांनी जाहीर केले आहे. सत्ताधारी पक्षाचे सरपंच प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत राजीनामा देत असल्याने परिसरात हा चर्चेचा विषय ठरत आहे.
_______________________________________________________
Post a Comment