माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका-- नगर तालुक्यातील जेऊर येथील बायजामाता यात्रोत्सवात हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले आहे. दोन वर्षानंतर भरण्यात आलेल्या यात्रोत्सवात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.
बुद्ध पौर्णिमेला गावचे ग्रामदैवत देवी बायजामाता यात्रा उत्सवास सुरुवात झाली होती. सोमवार दि. १६ ते बुधवार दि. १८ या दरम्यान यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. यात्रा उत्सवादरम्यान संपूर्ण राज्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात.
रहाटगाडगे, खेळणीचे दुकाने, खाऊचे दुकाने, विविध खेळ यांची प्रचंड रेलचेल यात्रेत असल्याने मोठी गर्दी होत आहे. यात्रोत्सवादरम्यान लाखो रुपयांची उलाढाल होत असते. दोन दिवस कुस्त्यांचा हगामा असणारे जेऊर हे एकमेव गाव आहे. वांगे भाकरीचा प्रसाद यात्रेचे वैशिष्ट्य मानले जाते.
यात्रोत्सवाकरीता नामदार प्राजक्त तनपुरे यांनी मोफत पाण्याची सोय केली आहे. पाण्याचे टॅंकर गावातील टाकीत टाकून यात्रेकरूंना पिण्याच्या पाण्यासाठी सोय नामदार तनपुरे यांच्या वतीने करण्यात आली आहे.
यात्रा उत्सवातील गर्दीचा फायदा चोरट्यांनीही घेतलेला दिसून आला. महिलांचे तसेच लहान मुलांचे दागिने चोरीला जाण्याचे प्रकार घडले आहेत. उत्सवादरम्यान येणाऱ्या भक्त भाविकांना सर्व सुविधा पुरविण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत.
_________________________________________
जागेची कमतरता अन् गर्दी
जेऊर गावचा यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात भरत असतो. यात्रा उत्सवातील दुकाने सीना नदीच्या पात्रात लावली जातात. येथे जागा अपुरी पडत असल्याने प्रचंड गर्दी होत आहे. या गर्दीचा फायदा चोरही घेतात. जेऊर गावाला यात्रा उत्सव तसेच आठवडे बाजारच्या जागेची समस्या भेडसावत आहे.
______________________________________
Post a Comment