माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका-- नगर तालुक्यातील पिंपळगाव तलावातील शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली असून झाडांची कत्तल करणा-यांवर कारवाई करण्यासाठी शिवप्रहार संघटनेचे युवक तालुका अध्यक्ष गोरख आढाव यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपळगाव तलावातील सुमारे ७०० एकर क्षेत्र महानगरपालिकेच्या ताब्यामध्ये आहे. त्यामध्ये विविध जातीचे मोठ मोठाली झाडे आहेत. गेल्या काही दिवसांपासून येथील झाडांची खुलेआम कत्तल सुरू आहे. याकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गोरख आढाव यांनी केला आहे.
तलावात मोठी वनसंपदा असून तिचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलेले आहे. तलावाच्या हद्दीतील मोठमोठाली वृक्ष तोडून लाखो रुपयांचे नुकसान करण्यात आलेले असतानाही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
पिंपळगाव तलाव महानगरपालिकेच्या ताब्यात असून त्यांनी झालेल्या वृक्षतोडीचा पंचनामा करून संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी गोरख आढाव यांनी केली आहे. पिंपळगाव तलावातील वृक्षतोड करणा-यावर कारवाई करण्यात आली नाही तर शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती गोरख आढाव यांनी दिली.
_____________________________________________________________________
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी वाद
पिंपळगाव तलावातील कत्तल झालेल्या झाडांची पाहणी करण्याकरता महानगरपालिकेचे अधिकारी आले असता त्यांच्याशीही संबंधित व्यक्तीने वाद घातला. सदर झाडे ही मीच तोडली असून माझ्या हद्दीतील आहेत त्यासाठी वन विभागाकडे अर्ज केलेला आहे. परंतु त्यांच्याकडून काहीही उत्तर न आल्यामुळे मी झाडे तोडले असल्याचे सांगुन संबंधित व्यक्तीकडून पालिकेच्या अधिकाऱ्यांशी वाद घालण्यात आला.
____________________________________________________________
फौजदारी गुन्हा दाखल करणार
पिंपळगाव तलावातील सुमारे चारशे ते पाचशे वृक्षांची तोड करण्यात आली आहे. प्रचंड प्रमाणात नुकसान करण्यात आलेले आहे. त्यामध्ये बाभळ, लिंब व इतर जातीच्या झाडांचा समावेश आहे. वनविभागाकडून झाडांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. त्याचा अहवाल आयुक्तांकडे सादर करून संबंधित व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
.... शशिकांत नजान (उद्यान विभाग प्रमुख, महानगरपालीका)
______________________________________________________________________
महानगरपालिकेने हद्द निश्चित करणे गरजेचे
पिंपळगाव तलावातील सुमारे ७०० एकर क्षेत्र
महानगरपालिकेच्या नावावर आहे. परंतु पालिकेकडून आपल्या क्षेत्राची हद्द निश्चित करण्यात आलेली नाही. महानगरपालिकेने सर्व क्षेत्राची तात्काळ मोजणी करून कंपाउंड करणे गरजेचे आहे. त्यामुळे तेथे अतिक्रमण होणार नाही व असे वृक्षतोडीचे प्रकार घडणार नाहीत. त्यासाठी महानगरपालिकेने पिंपळगाव तलावातील आपली हद्द निश्चित करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
_____________________________________________________________
Post a Comment