माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका-- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व जागा जिंकून सत्ता येणार आहे. तसेच नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीही महाविकास आघाडीच्या ताब्यात येणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी केले आहे.
नगर तालुक्यातील पोखर्डी येथे झालेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा व भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन शशिकांत गाडे यांच्या अध्यक्षतेखाली राहुरी माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे, रघुनाथ झिने, बाबासाहेब भिटे, तालुकाध्यक्ष रोहिदास कर्डिले, प्रा. सिताराम काकडे, केशव बेरड, सरपंच रामेश्वर निमसे, दत्तात्रय डोकडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी ३ कोटी ६६ लाख रुपयांच्या कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना शशिकांत गाडे यांनी कोणी कोणाचे कितीही सत्कार करू द्या त्याने मतदानावर फरक पडणार नाही. दहशतीचे राजकारण करण्याचे दिवस गेले. विकास कामे केले असते तर निवडून आले असते. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व बाजार समिती मध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचे गाडे यांनी ठामपणे सांगितले.
यावेळी गाडे यांनी कोणाचेही नाव न घेता विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. यापूर्वी फक्त वृत्तपत्रातील जाहिरातीतून विकास कामे पाहत होतो. पण प्रत्यक्षात कामे झाली नाहीत. त्याचा निधी कोठे गेला याची चौकशी करणे गरजेचे आहे. बाजार समिती, साखर कारखाना, दूध संघाचे कोणी वाटोळे केले. दूध संघाची जागा विकली गेली याची सर्व माहिती मतदारांना आहे. नगर-राहुरी-पाथर्डी मतदार संघ भाग्यवान आहे. आमदार बदलला अन तुम्हाला मंत्री मिळाला त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. फक्त उद्घाटन, भूमिपूजन न करता विकास कामे सुरू आहेत. झालेल्या कामांचे उद्घाटन देखील करण्यात येत नाही. त्यामुळे जोपर्यंत राहुरी मतदारसंघ बदलत नाही तोपर्यंत नामदार प्राजक्त तनपुरे हेच आमदार राहतील. विरोधकांनी श्रीगोंद्यातुन आमदारकीसाठी चाचपणी सुरू केली आहे. परंतु आता त्यांनी आमदारकीचे स्वप्न पाहू नये. जनता त्यांना कदापि स्वीकारणार नाही, असेही गाडे यांनी सांगितले.
माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे यांनी सांगितले की, मतदारसंघात रस्ते, वीज, पाणी, रोहित्र, शाळा, शाळेमधील अत्यावश्यक साहित्य ही कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मागणी केली की काम करण्यात येत आहे. प्राजक्त तनपुरे यांच्याकडे सहा खाती तसेच गोंदियाचे पालकमंत्रिपद असल्याने मतदारसंघासाठी वेळ कमी मिळत आहे. वेळ कमी मिळत असला तरी मतदारसंघात विकासाची भरमसाठ कामे सुरू आहेत. त्यामुळे सर्वांनी प्राजक्त तनपुरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन उषाताई तनपुरे यांनी केले.
सरपंच रामेश्वर निमसे यांनी ना. तनपुरे यांच्या निधीतून गावामध्ये झालेली विकास कामे व प्रस्तावित कामांची माहिती दिली. तसेच नगर तालुक्याला तनपुरे यांनी भरीव निधी दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी रामदास ससे, सरपंच भिमराज मोकाटे, सरपंच मुबारक पठाण, किशोर शिकारे, राम कदम, दिलीप बनकर, भास्कर मगर, विलास मोहिते पोखर्डी ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य तसेच पंचक्रोशीतील आजी-माजी सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
_________________________________
.......म्हणून युतीचा धर्म पाळला नाही
गेल्या विधानसभा निवडणुकीत नगर-राहुरी-पाथर्डी मतदार संघात विकासाची कामे करणारा, सुसंस्कृत, दहशत नसणारा आमदार व्हावा. मतदार संघातील विकास कामे पूर्ण व्हावीत. यासाठी आम्ही युतीचा धर्म न पाळता जाहीरपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राजक्त तनपुरे यांचा प्रचार केला अन् त्यांना विजयी केले. त्याचा निश्चितच फायदा आज विकासकामांमधुन दिसुन येत आहे.
..... शशिकांत गाडे (शिवसेना जिल्हाप्रमुख)
_______________________
पिंपळगाव तलाव पाटबंधारे खात्याकडे वर्ग होणार ?
पिंपळगाव तलाव हा पंचक्रोशीतील ग्रामस्थ व शेतकऱ्यांसाठी हिताचा आहे. त्यातील पाण्याचा उपयोग परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना होण्यासाठी तलाव पाटबंधारे विभागाकडे वर्ग होणे गरजेचे आहे. त्यासाठी ना. तनपुरे यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. परिसरातील गावांचे ठराव घेण्यात आले असून प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तलावाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.
..... रघुनाथ झिने (माजी सभापती अर्थ आणि बांधकाम समिती)
_____________________________________________
Post a Comment