गॅस पाईप लाईनच्या ठेकेदाराची मुजोरी थांबता थांबेना जेऊर पंचक्रोशीतील सरपंच आक्रमक ; पोलीसांकडून कारवाईचा इशारा

 माय अहमदनगर वेब टीम


नगर तालुका-- नगर औरंगाबाद महामार्गालगत सुरू असलेल्या गॅस पाईपलाईनच्या ठेकेदाराची मुजोरी थांबत नसल्याने पंचक्रोशीतील सरपंचाने एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांना निवेदन देऊन संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

    याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर-औरंगाबाद महामार्गावर गॅस पाईपलाईनचे काम सुरू असून त्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. संबंधित ठेकेदाराने मनमानी काम केले असून शेतकरी, व्यावसायिक, धार्मिक स्थळे तसेच परिसरातील विविध पुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. काम हे मनमानी व नियोजन शुन्य पद्धतीने सुरू आहे. रस्त्यावर मधोमध वाहने लावून काम सुरू आहे. तसेच माती, मुरूम रस्त्यावर पडत असल्याने अनेक अपघात घडत आहेत. अपघातात अनेक निष्पापांचे बळी जात आहेत.

      ठेकेदाराची मुजोरी थांबता थांबत नसल्याने संबंधित ठेकेदाराचे काम संतप्त नागरिकांनी बंद पाडले होते. तरी ठेकेदाराने इमामपुर परिसरात काम सुरू ठेवून अर्जुन टिमकरे यांचे कंपाऊंड तोडून मोठे नुकसान केले असल्याची माहिती टिमकरे यांनी दिली. पुलांचे नुकसान करण्यात आल्याने पावसाळ्यात शेतीचे बांध वाहून जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.

      ठेकेदाराच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकरी, व्यवसायिक यांनी प्रचंड विरोध केला होता. धनगरवाडी तसेच वाघवाडी येथील युवकांचा पाइपलाइनच्या कामामुळे अपघातात मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.  त्यामुळे  युवकांच्या मृत्यू प्रकरणी ठेकेदारावर सदोष  मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

       नगर-औरंगाबाद महामार्गावर गॅस पाईपलाईनचे काम करताना शेकडो वृक्षांची कत्तल, वाहतूक, विद्युत वाहिन्यांची शिफ्टिंग तसेच इतर परवानगी कशाच्या आधारे व कोणते नियम,अटी लावून देण्यात आल्या. परवानगी देणा-या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

      परिसरात कोणत्याही परिस्थितीत काम होऊ देणार नसल्याचा पवित्रा सरपंचाचे शिष्ट मंडळाने घेतला आहे. अगोदर नुकसान झालेल्या शेतकरी, व्यावसायिक, अपघातात बळी गेलेले युवक यांना मदत मिळावी तसेच संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

      याप्रसंगी पोखर्डी सरपंच रामेश्वर निमसे, धनगरवाडी सरपंच शुभांगी शिकारे, किशोर शिकारे,  इमामपुर सरपंच भिमराज मोकाटे, डोंगरगण उपसरपंच संतोष पटारे, राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त जाती जमाती सेलचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय डोकडे, रामदास ससे व ग्रामस्थ उपस्थित होते.

________________________________

 सार्वजनिक बांधकाम विभाग गप्प का ?

 गॅस पाईपलाईनच्या कामात एवढा सावळागोंधळ सुरू असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गप्प का ? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत संबंधित ठेकेदारावर कारवाई होणे गरजेचे आहे. परंतु कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू आहे.

______________________________

 कामाची पाहणी करून कारवाई करणार

 संबंधित कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान व इतर बाबींची पाहणी करून पुढील कारवाई करण्यात येईल. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी कामाच्या गलथान कारभाराबाबत संबंधित ठेकेदाराला चांगलेच फैलावर घेतले होते. सरपंचांच्या शिष्टमंडळाला ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन युवराज आठरे यांनी दिले आहे.

___________________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post