मशीनरींची तोडफोड करून जाळून टाकू संतप्त ग्रामस्थांचा इशारा ; गॅस पाईपलाईनचे काम पाडले बंद

 माय अहमदनगर वेब टीम 


 नगर तालुका-- नगर-औरंगाबाद महामार्गावर गॅस पाईपलाईनचे सुरू असलेले अनागोंदी कामाविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 

     जेऊर ग्रामपंचायतचे पदाधिकारी आदिनाथ बनकर, आप्पा बनकर, अनिल ससे, दिनेश बेल्हेकर, अण्णा मगर, बाबासाहेब मगर यांच्यासह ग्रामस्थ गॅस पाईपलाईनच्या कामा विरोधात आक्रमक झाले होते. काम करणाऱ्या मशीनरींची तोडफोड करून जाळण्याचा इशारा या वेळी संतप्त नागरिकांकडून देण्यात आला. गॅस पाईपलाईनचे काम मनमानी पद्धतीने सुरू असून ठेकेदाराची मुजोरी सुरूच आहे. काम करताना सर्व नियम धाब्यावर बसवून काम सुरू आहे.

     शेकडो झाडांची कत्तल, शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान, अनेक व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान तसेच कामातील हलगर्जीपणामुळे अपघातात अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत. असा आरोप यावेळी ग्रामस्थांकडून करण्यात आला. गावाला पिण्याच्या पाण्यासाठी बु-हाणनगर वरून येणारी पाईपलाईन वारंवार फोडण्यात येत आहे. त्यामुळे जेऊर गावामध्ये पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाईपलाईन फोडल्यानंतर ती तात्काळ जोडून दिली जात नाही त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.

 त्यामुळे संतप्त नागरिकांनी पाईपलाईनचे काम बंद पाडले.

      गॅस पाईपलाईन कामांमध्ये सावळागोंधळ सुरू असून देखील प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने ग्रामस्थ आश्चर्य व्यक्त करत आहेत. ठेकेदारांची मनमानी सुरू असून त्यावर तात्काळ कारवाई करावी, पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईनची दुरुस्ती करावी, अपघातात मृत झालेल्या व्यक्तींबद्दल संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच शेतकरी व व्यावसायिक यांचे झालेले नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. अन्यथा कोणत्याही परिस्थितीत काम करू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला.

_____________________________

गॅस पाईपलाईन चे काम बोगस पद्धतीने सुरू आहे. नियोजन नसल्याने शेतकरी, व्यवसायिक यांचे नुकसान तसेच अपघातात बळी जाणाऱ्या घटना घडतच आहेत. जेऊर पिण्याची पाईपलाईन वारंवार फोडण्यात येत असल्याने ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत. संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी. अन्यथा कोणत्याही परिस्थितीत काम करू देणार नाही. शेतकऱ्यांचा आक्रोश निर्माण झाल्यास मोठा अनुचित प्रकार घडू शकतो.

..... दिनेश बेल्हेकर (ग्रामपंचायत सदस्य)

_____________________________________

जिल्हाधिकारी तसेच जिल्हापोलीस प्रमुख यांनी लक्ष घालण्याची गरज

 संबंधित ठेकेदाराची मनमानी सुरू असून गॅस पाईपलाईन च्या कामाला शेतकरी, व्यवसायिक, नागरिक सर्वजण वैतागले आहेत. त्या विरोधात अनेक वेळा आवाज उठवून देखील त्याची दखल प्रशासनाकडून घेण्यात आलेली नाही. संबंधित ठेकेदारा विरुद्ध अनेक गुन्हे दाखल होतील. परंतु प्रशासनाकडून काहीही कारवाई करण्यात येत नाही. तरी या ठेकेदाराच्या मुजोरीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीसप्रमुख यांनी लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

_____________________________

 संबंधित ठेकेदाराला आशीर्वाद कुणाचा ?

मनमानी पद्धतीने काम सुरू असून शेतकरी, व्यवसायिक, नागरिक त्या विरोधात आवाज उठवत आहेत. परंतु संबंधित ठेकेदाराची मुजोरी थांबता थांबत नाही. अनेक निष्पापांचे बळी जाऊन देखील ठेकेदारावर कारवाई होत नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर आशीर्वाद कोणाचा असा प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे. शेतकरी रस्त्यावर आल्यावर ठेकेदाराला सर्व नियम व कायदे सांगतील अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

_____________________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post