माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका--नगर तालुक्यातील जेऊर परिसर गेल्या चार दिवसांपासून अंधारात आहे. पहिल्याच पावसाने महावितरण कंपनीचे पितळ उघडे पाडल्याचे चित्र परिसरात पहावयास मिळत आहे. महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य दिनेश बेल्हेकर यांनी दिला आहे.
शनिवार दि. ११ जुलै रोजी जेऊर परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला होता. त्या पावसात महावितरण कंपनीचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. परिसरातील विद्युत खांब विद्युत वाहिन्यांची दाणादाण उडाली आहे. अनेक खांब, विद्युत वाहिन्या तुटून पडलेल्या आहेत.
चार दिवस झाले तरी विद्युत पुरवठा सुरळीत झाला नसल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. जेऊर परिसरामध्ये विजेचा खेळखंडोबा ही नित्याचीच बाब बनली आहे. पावसामुळे नादुरुस्त झालेल्या विद्युत वाहिन्या व विद्युत खांबांची दुरुस्ती विद्युत वितरण कंपनीकडून तात्काळ करणे गरजेचे असताना देखील कर्मचारी व अधिकारी वर्गाकडून हलगर्जी पणा करण्यात येत असल्याचा आरोपही बेल्हेकर यांनी केला आहे.
महावितरण कंपनीच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असून त्यामुळे विद्युत वाहिनीच्या दुरुस्तीसाठी नेहमीच उशीर होत असतो. गेल्या चार ते पाच दिवसांपासून अनेक भागातील बत्ती गुल असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. तरी जेऊर परिसरातील विद्युत पुरवठा तात्काळ सुरळीत करावा अन्यथा माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य दिनेश बेल्हेकर यांनी दिला आहे.
__________________________________________________
अधिकारी तसेच कर्मचारी यांना फोन घेण्याची 'ॲलर्जी'
जेऊर परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला असून अनेक शेतकरी व नागरिक महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना फोन करत असतात. परंतु अधिकारी व कर्मचारी यांना नागरिकांचे फोन घेण्याची'ॲलर्जी' असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. जेऊर महावितरण कार्यालयातील कर्मचारी प्रत्येक कामात हलगर्जीपणा करताना दिसून येतात. आपली जबाबदारी दुस-यावर ढकलून मोकळे होण्याचा प्रकार नेहमीच पाहावयास मिळत आहे.
____________________________________________
अधिका-यांपेक्षा ठेकेदारी पद्धतीचे कामगार 'शिरजोर'
जेऊर महावितरण कंपनीच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. बहुतेक काम हे ठेकेदारी पद्धतीवर घेतलेल्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत असून अधिका-यांपेक्षा तेच शिरजोर झाल्याचे चित्र गावांमध्ये पहावयास मिळत आहे. तेच शेतकरी व नागरिकांशी अरेरावी करून केलेल्या कामाचे पैसे उकळत असल्याचा आरोप अनेक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. तरी ठेकेदारी पद्धतीवर कामावर घेतलेल्यांना काढून टाकण्याची मागणी करण्यात येत आहे.
_________________________________________________
तळीरामांची संख्या जास्त
जेऊर महावितरण कंपनीमध्ये बहुतेक कर्मचारी है दारूच्या नशेत तुर्र असतात. दारूच्या नशेत कामावर येणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना कंपनीने काढून टाकले आहे. तरीदेखील जेऊर येथील कार्यालयात कर्मचारी हे सकाळीच दारू पिऊन कामावर येत असल्याचा अनुभव परिसरातील शेतकऱ्यांना आला आहे. अशा तळीरामांना कंपनीने काढून टाकणे गरजेचे आहे. अशी मागणीही ग्रामस्थांमधून होत आहे.
_______________________________________________
Post a Comment