माय अहमदनगर वेब टीम
शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे रविवारी पहाटे अपघाती निधन झाले. ते 52 वर्षांचे होते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भाताण बोगद्याजवळ त्यांच्या गाडीचा पहाटे 05.05 च्या सुमारास अपघात झाला. त्यांना तत्काळ मदत मिळाली नाही. ते तासभर घटनास्थळीच पडून होते. त्यानंतर सकाळी त्यांना पनवेल स्थित एमजीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार होणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी विनायक मेटेंच्या दुर्दैवी निधनावर शोक व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेटे यांच्या गाडीने अनोळखी वाहनाला धडक दिल्याची माहिती आहे. विनायक मेटे यांचा मुलगा गाडी चालवत होता. यामध्ये त्यांचा मुलगाही किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.
विनायक मेटे आपला एक सहकारी आणि बॉडीगार्ड यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. आज दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीसाठी ते मुंबईला येत होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा आमदार प्रवीण दरेकर एमजीएम रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाले.
अपघात नेमका कसा घडला?
मेटेंसोबत प्रवास करणाऱ्या एकनाथ कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात एका ट्रकने हुल दिल्यामुळे घडला. ते म्हणाले -“आम्ही बीडवरून मुंबईला जात होतो. रस्त्यात एका ट्रकने आम्हाला हुल दिली. या ट्रकच्या बंपरमध्ये आमची कार अडकली. त्याच स्थितीत आमची कार काही अंतरापर्यंत फरफटत गेली. ही घटना पहाटे 5 च्या सुमारास घडला. पण मदत पोहोचण्यासाठी तासभर लागला. मी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला. पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. सकाळी 6 च्या सुमारास रुग्णवाहिका आमच्यापर्यंत पोहोचली.“
डॉक्टर काय म्हणाले?
विनायक मेटे यांचे पहाटे निधन झाले. त्यात त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली होती. त्यांचे निधन घटनास्थळी झाले होते. त्यांना सकाळी 6.20 मिनीटांनी रुग्णालयात आणले असता, त्यांची तपासणी करण्यात आली, तेव्हाच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर आणि एक पोलिस हे देखील या अपघातात गंभीररित्या जखमी झाले आहेत. आमचे डॉक्टर त्यांना उपचार करण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. त्यांच्या ड्रायव्हरची प्रकृती मात्र चांगली आहे.- कुलदीप सलगोतरा, एमजीएम हॉस्पिटल मेडिकल डायरेक्टर
सामाजिक प्रश्नांसाठी तीव्र भूमिका
विनायक मेटे अनेक वर्षे महाराष्ट्र विशेषत: मराठवाड्याच्या सामाजिक जिवनात सक्रीय होते. या क्षेत्रात त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. सामाजिक प्रश्नांसाठी त्यांच्या भूमिका तीव्र होत्या. आपल्या मागण्यांसाठी ते अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडती करत होते. सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी मेटेंच्या निधनाचे वृत्त कळाले. त्यामुळे धक्काच बसला. महाराष्ट्राच्या सामाजिक जिवनात मेटेंनी मोलाची कामगिरी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विनायक मेटे यांचे कुटुंबीय व सहकाऱ्यांच्या दु:खात सहभागी आहे.- शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
विश्वास बसत नाही
विनायक मेटे यांचे निधन झाले यावर माझा विश्वास बसला नाही. मराठा आरक्षणासाठी त्यांनी खूप संघर्ष केले. सातत्याने त्यांची तळमळ मला जाणवली. त्यांचा एकच ध्यास होता की, मराठा समाजाला न्याय मिळेल. आज अतिशय महत्वाची बैठक आम्ही ठेवली होती. मात्र, दुर्दैवी त्यांचे निधन झाले आहे. सरकार त्यांच्या कुटुंबासोबत आहे. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
Post a Comment