जेऊर गटातून बहिरवाडी सरपंच अंजना येवले यांचे नाव आले चर्चेत ! सरपंच म्हणून आदर्श असे केलेल्या कार्याची दखल ; आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त

माय अहमदनगर वेब टीम 


नगर तालुका- नगर तालुक्यातील जेऊर गटातून बहिरवाडी गावच्या सरपंच सौ. अंजना येवले यांचे नाव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी चर्चेत आले असून त्यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचा दावा येवले समर्थकांकडून करण्यात येत आहे. 

      बहिरवाडी गावच्या सरपंच पदाची धुरा सौ. अंजना येवले यांनी दहा वर्षे सांभाळलेली आहे. त्यामुळे त्यांना प्रशासकीय तसेच राजकीय, सामाजिक सर्व कार्याची माहिती व अनुभव आहे. उच्चशिक्षित नेतृत्व तसेच चांगले वकृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सौ. अंजना येवले यांनी सरपंच पदाच्या माध्यमातून गाव विकासासाठी घेतलेले ठोस निर्णय चर्चेत राहिलेले आहेत. त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

     बहिरवाडी गावामध्ये विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात नेहमीच त्यांचा पुढाकार असतो. कोरोनाच्या काळात बहिरवाडी गावाने राबविलेल्या योजनांचा आदर्श तालुक्यातील इतर गावांनी घेतला होता. बहिरवाडी गाव जेऊर गटात सर्वात अगोदर कोरोना मुक्त करण्यात येवले तसेच त्यांचे सहकारी ग्रामपंचायत सदस्य यांची मोलाची भूमिका राहिलेली आहे.

     गाव विकासासाठी अंजना येवले नेहमीच अग्रेसर असतात. त्यांचे पती संजय येवले सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेताना दिसून येतात. संजय येवले यांचा गटातील मित्रपरिवार व नातेसंबंध हा निवडणुकीसाठी निश्चित फायद्यात राहणार असल्याचा कयास राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे.

    माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे कट्टर समर्थक म्हणून येवले यांच्याकडे पाहिले जाते. अंजना येवले यांची सरपंच म्हणून राहिलेली कारकीर्द व त्या काळात घेतलेले निर्णय तालुक्यात चांगलेच चर्चिले गेलेले आहेत. राजकारण कम समाजकारण जास्त हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून फक्त गाव विकासाचा ध्यास घेतलेल्या सरपंच सौ. अंजना येवले यांच्या कार्याची दखल तसेच चर्चा संपूर्ण तालुक्यात नेहमीच होत असते.

      जेऊर गट सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्यानंतर सर्वप्रथम नाव आले ते अंजना येवले यांचे. अंजना येवले यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवावी असा आग्रह गटातील अनेक कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. उच्चशिक्षित व प्रशासकीय कामकाजाचा अनुभव यामुळे जेऊर गटाला अंजना येवले यांच्या रूपाने चांगले नेतृत्व मिळणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून कार्य करत असताना गाव पातळीवर येणाऱ्या अडीअडचणी व त्या समस्यांचे निराकरण करण्याचे उपाय याची चांगलीच माहिती अंजना येवले यांना झालेली आहे.

     तसेच जेऊर गटातील प्रत्येक गावातील समस्यांचा गाढा अभ्यास व त्या समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता अंजना येवले यांच्यामध्ये असल्याने त्यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे. अंजना येवले यांच्या रूपाने मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत उच्चशिक्षित व अनुभवी नेतृत्व गेल्याने जेऊर गटाचा निश्चितच विकास व फायदा होईल. त्यांच्या शिक्षणाचा व अनुभवाचा त्या गटाचा विकास करण्यासाठी वापर करतील असा अंदाज नागरिकांमधून बांधला जात आहे.

     माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या सौ. अंजना येवले यांना पक्षश्रेष्ठी त्यांच्या कार्याचा विचार करून उमेदवारी देतील अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे. अंजना येवले व त्यांचे पती संजय येवले यांनी निवडणुकीसाठी तयारी ही सुरू केली असून मतदारसंघात भेटीगाठी घेण्याचे काम चालू केलेले आहे. आता फक्त प्रतीक्षा आहे ती पक्षश्रेष्ठींच्या आदेशाची......

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post