शुढळेश्वर महादेव परीसर, गोसावी बाबा टेकडी, कोथुळ घाटात नयनरम्य नजारा..
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर / दादासाहेब आगळे :- नगर तालुक्यातील गुंडेगावमधील डोंगरात सध्या ऊन, पाऊस, सप्तरंगी इंद्रधनुष्य, डोंगर रांगेतील टेकडींवर ढगांचा खेळ पहायला मिळत आहे.
महाबळेश्वरला पावसाळ्यात जसं निसर्गाच वेगळं रूप पाहायला मिळत तसच काहीसं निसर्गाचं वेगळं रूप सध्या गुंडेगाव डोंगर रांगेत पाहायला मिळत आहे. सप्तरंगी इंद्रधनुष्य, क्षणार्धात धुकेरुपी ढगांनी व्यापून टाकणारी डोंगर रांगा... मध्येच येणारी पावसाची सर.. हे सारं दृश्य सध्या गुंडेगाव येथील शुढळेश्वर मंदिर, गोसावी बाबा टेकडी (पंचटेकडी), राजधानी खंडोबा गड डोंगर रांगेत अनुभवायला मिळत आहे. म्हणूनच या परिसराला दुसरे मिनी महाबळेश्वर म्हटलं जाते.
हा स्वर्गरुपी निसर्गाचा मनमोहक नजारा पहाताना पर्यटक आकर्षित होऊन पुन्हा पुन्हा भेट देताना दिसतात. डोळ्याचं पारणं फेडणारा हा परिसर मनाला भुरळ घालतो आहे. हा निसर्गाचा नजारा या घाटातील रस्त्यावरून ये-जा करताना कधी सकाळी तर कधी सायंकाळच्या वेळेला घाटात जणू निसर्गाने ढगांची चादरच पसरली आहे. असा अनुभव डोंगर रांगेत सध्या अनुभवला जात आहे. जैवविविधतेने नटलेले गुंडेगाव डोंगर रांगेत सध्या निसर्गाची अद्भुत किमया पाहायला मिळत आहे. तसेच डोळ्याचं पारणं फेडणारी दृश्य आहेत. गुंडेगावातील गोसावी बाबा टेकडी, राजधानी खंडोबा गड, कोथुळ घाटातून ये जा करताना हा नजारा काही औरच दिसत आहे.
गुंडेगावचा परिसर नैसर्गिक दृष्ट्यीने अतिशय चांगला असल्याने या ठिकाणी पक्ष्यांची मधुर किलबिल, थंडगार वारा, खळखळ वाहणारे झरे, हळूच मान वर करून पाहणारे ससे, पानाफुलांनी बहरलेली वृक्ष सैरावैरा धावणारे हरणांचे कळप, मन मोहून घेणारी फुलझाडी, उंचावरून कोसळणारे धबधबे वेगवेगळ्या रंगांच्या फुलांवरून अलगत उडणारी रंगीबेरंगी फुलपाखरे हिरवीगार घनदाट झाडी, सुगंध देणारी जमीन उंच उंच टेकड्या, आदिमानवाची वसाहत असल्याचे ठिकाण, आणि यात हरवलेले श्री शुढळेश्वराचे मनमोहक सुंदर असे मंदिर पर्यटकांना खिळवून ठेवते. गुंडेगाव म्हणजे निसर्गाचा अद्भूत चमत्कार आहे. गुंडेगाव डोंगरात अनेक लहान-मोठे धबधबे पावसाळ्यात प्रवाहित होताना पहावयास मिळतात. हिरव्यागार डोंगर रांगा त्यावर अच्छादलेला जणू हिरवा शालू डोंगरातून नागमोडी वळणे घेत जाणारा रस्ता. तर खडकांतून कपारीतून वाहणारे लहान-मोठे धबधबे, अंगाला झोंबणारा गार गार वारा, अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या लहान मोठ्या सरी असा विलोभनीय निसर्गाचा मुक्त अविष्कार पाहण्यासाठी गावातील लोक व पर्यटक पावसाळ्यात फेरफटका मारताना दिसत आहेत. डोंगर कपारीतून ओसंडून वाहणारा हा धबधबा गुहेच्या तोंडाशी पडताना दिसतो. त्यामुळे या डोंगर परिसरात प्रवास करताना या धबधब्याचे विलोभनीय दृश्य पाहिल्याशिवाय पुढे जावूच वाटत नाही तसंच या धबधब्यावरती आंघोळीचा मोह आवरणार नाही हे नक्की अशा या निसर्गरम्य ठिकाणी पिकनिक पॉईंट तयार करणे गरजेचे आहे. त्यामुळे पर्यटकांना बिनधास्त आनंद घेता येईल. जेणेकरून पिकनिक पॉइंट वरून पर्यटक डोंगरकपारी बरोबरच दऱ्याखोऱ्यांचे विलोभनीय दृश्य बिनधास्त पाहतील अशातच पावसाळ्यात लहान-मोठे धबधबे पर्यटकांना हळूच खुणावत आहेत लांबून येणारे पक्ष्यांचे व मोरांचे, रानगव्याचे आवाज ऐकून मन हरखून जाते. पावसाळ्यात शनिवार-रविवार या सुटीच्या दिवशी हौशी व धाडसी पर्यटक पावसाळी पर्यटनाचा आनंद घेत ये जा करत असताना हे नयनरम्य दृश्य आपल्या मोबाईलमध्ये किंवा कॅमेऱ्यात कैद करताना दिसत आहेत.
अहमदनगर पासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेले नगर तालुक्यातील गुंडेगाव निसर्गरम्य वातावरणाने भरून गेले आहे. गावाला ८५० हेक्टर वनक्षेत्र आहे.यामधील ५५० हेक्टर मध्ये वन समितीमार्फत वृक्ष लागवड करण्यात आली आहे. आज या वृक्षांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. डोंगरमाथ्याचा प्रदेश असल्याने ५५० हेक्टर क्षेत्रात सीसीटी करण्यात आली तर ३०० एकर क्षेत्रात डीप सीसीटी बांधण्यात आले. वनक्षेत्रात ११ मातीचे बंधारे तर दोन वन तलाव बांधले. यामुळे डोंगरावरून वाहून जाणारे पाणी डोंगरातील जिरु लागले. गावच्या वन क्षेत्रात सामाजिक वनीकरण मार्फत ३४ हजार वृक्ष लागवड करण्यात आली. १६ किलोमीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूने आणि शेताच्या बांधावर वृक्ष लागवड करण्यात आली. सध्या ही झाडे मोठी झाल्याने गावाच्या सौंदर्यात भर पडली आहे.
बाळासाहेब हराळ
मा. सभापती - अर्थ बांधकाम सभापती
जिल्हा परिषद, अहमदनगर.
Post a Comment