माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका- नगर तालुक्यातील जेऊर पंचक्रोशीत रानटी कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून पाळीव प्राण्यांवर हल्ला तर लहान मुलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटना परिसरात घडलेल्या आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर गावठाण, वाघवाडी, बहिरवाडी, इमामपूर डोंगररांगांनी रानटी कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हे कुत्रे टोळक्याने फिरत असून पाळीव प्राण्यांवर त्यांच्याकडून हल्ला करण्यात येत आहे. रविवार दि. ४ रोजी बहिरवाडी येथील दोन गायींवर या कुत्र्यांनी हल्ला करून गायांना जखमी केले आहे. तर शाळेतील विद्यार्थ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता परंतु नागरिकांच्या सतर्कतेमुळे कुत्र्यांच्या हल्ल्यापासून मुले बचावली आहेत.
जेऊर परीसरातील डोंगररांगांनी मागील वर्षी महानगरपालिकेच्या वतीने पकडण्यात आलेल्या कुत्र्यांना सोडण्यात आल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत. या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून रानटी कुत्रे हे शिकारीसाठी टोळक्याने फिरत आहेत. शेळ्या, मेंढ्या तसेच पाळीव कुत्र्यांवर देखील त्यांच्याकडून हल्ला होण्याचे प्रकार घडलेले आहेत. मागील महिन्यात जेऊर गावातील काही नागरिकांना या कुत्र्यांकडून चावा घेण्यात आला होता.
जेऊर शिवारातील डोंगररांगांनी मोठ्या प्रमाणात रानटी कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जेऊर, बहिरवाडी, इमामपूर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
__________________________________________
जेऊर व बहिरवाडी परिसरात रानटी कुत्र्यांची संख्या खूपच वाढली आहे. त्यांच्याकडून पाळीव प्राण्यांवर हल्ला करण्याच्या घटना घडत आहेत. बहिरवाडी येथे दोन गायांना या कुत्र्यांनी चावा घेतला असून लहान मुलावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तसेच माझ्या घरच्या पाळीव कुत्र्यावर या टोळक्याने हल्ला करून जखमी केले आहे. शालेय लहान विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. तरी रानटी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.
..... राजू दारकुंडे (भाजप तालुका उपाध्यक्ष)
___________________________________________
Post a Comment