माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका- नगर तालुक्यातील जेऊर येथील लिटिल वंडर्स स्कूल मध्ये इयत्ता सातवीच्या कार्तिक अशोक काळे याने नुकत्याच नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सब ज्युनिअर कॅटेगरीत सुवर्णपदक पटकावून मोठे यश मिळविले आहे.
शाळेच्या वतीने त्याचा भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शेंडीचे उपसरपंच प्रवीण गुंड, माजी पंचायत समिती सदस्य श्रीमती कल्पना काळे, कार्तिकचे पालक तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते. शाळेचे प्राचार्य के. व्ही. दुबे यांनी कार्तिकच्या यशाचे कौतुक केले व मुलांनी त्याचा आदर्श घेऊन वेगवेगळ्या खेळात भाग घेण्याचे आवाहन केले. तसेच मुलींनीही मागे न राहता खेळामध्ये सहभाग घ्यावा व शाळेचे तसेच गावाचे नाव उंचवावे असे आवाहन केले. यावेळी कार्तिकला प्रमाणपत्र व सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले.
उपसरपंच प्रवीण गुंड यांनी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून नाशिक येथे स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंशी निकराने झुंज देऊन कार्तिकने मिळविलेले हे विशेष महत्त्वाचे आहे. त्याची नॅशनल लेव्हलला निवड झाली असून त्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्तिकचे पालक अशोक काळे यांनी प्रत्येक मुलाने खेळात सहभाग घ्यावा खेळात हार-जीत होतच असते. त्यातूनच जीवनात येणारे अपयश पचविण्याची ताकद निर्माण होते असे मनोगत व्यक्त केले. कार्तिकला नगर येथील छत्रपती तायक्वांदो अकॅडमीचे नारायण कराळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
शाळेच्या संचालिका सौ. स्वाती चेमटे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी शाळेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. शिक्षणाबरोबरच खेळाला ही महत्त्व आहे. आजच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल आल्याने विद्यार्थ्यांचे मैदानी खेळाकडे दुर्लक्ष झाल्याची खंत चेमटे यांनी व्यक्त केली. तसेच त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. उत्तम आरोग्य राहण्यासाठी मैदानी खेळ आवर्जून खेळले पाहिजेत. त्यासाठी विद्यालयाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती सौ.स्वाती चेमटे यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. राणी जरे यांनी केले.
__________________________________
लिटिल वंडर्स स्कूलचा प्रगतीचा आलेख उंचावतोय
शांतिनिकेतनच्या लिटिल वंडर्स स्कूलच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावताना दिसून येत आहे. संस्थेच्या संचालिका सौ. स्वाती चेमटे यांच्या कल्पक नेतृत्वाखाली येथील विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत. अभ्यासाबरोबर खेळातही विद्यार्थी चमकत आहेत. शाळेच्या निकालाची परंपरा तसेच सर्वच बाबतीत विद्यालय अग्रस्थानी आहे. सौ. स्वाती चेमटे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे याच उद्देशाने विद्यालय सुरू केले असल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून विद्यालयाचे कौतुक करण्यात येत आहे.
Post a Comment