माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका- नगर तालुक्यातील निंबळक येथील शेतकऱ्यांने शेतीसाठी नवीन अवजार बनवले असून 'त्या'अवजाराची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. हे अवजार अनेक अवजारांचे काम एकटेच करत असून शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर ठरत आहे. सदर अवजाराच्या खरेदीसाठी जिल्ह्यातून मागणी होत आहे.
निंबळक येथील शेतकरी नवनाथ सूर्यभान घोलप हे शेती व्यवसाय करतात. शेतीबरोबर ट्रॅक्टर चालवताना शेतीच्या मशागतीसाठी काकऱ्या, पाळी, पेरणी, पणजी, रोटा, नांगरट करताना प्रत्येक वेळी वेगळी अवजारे जोडावी लागत असतात. तसेच प्रत्येक वेळी शेतात ट्रॅक्टर घातल्याने ओल्या जमिनीत तुडा -तुडवीचे प्रमाण वाढते. त्यामुळे या सर्वांवर मात करत एकाच अवजाराने ही सर्व कामे करता आली तर शेतकऱ्यांना खूपच फायदा होईल. या विचाराने प्रेरित होऊन नवनाथ घोलप यांनी अशा प्रकारचे अवजार बनविण्याचा संकल्प केला.
काकऱ्या, पाळी, पेरणी, पणजी, रोटा, नांगरट ही सर्व कामे एकाच अवजाराने होतील अशा स्वरूपाचे अवजार बनविण्यात आले असून त्यासाठी सुमारे तीन वर्षाचा कालावधी लागला असल्याची माहिती नवनाथ घोलप यांनी दिली. या अवजारामुळे सर्व कामे एकाच वेळी होत असल्याने वारंवार ट्रॅक्टर शेतात घालावा लागत नाही. तसेच बैलाच्या नांगरटीप्रमाणे रान पलटी होत असल्याने शेतात चढ-उतार होत नाही. पर्यायाने मृदा संधारणासाठी अवजार फारच उपयुक्त ठरत असल्याचा दावा घोलप यांनी केला आहे.
सदर अवजारासाठी एकरी इंधन देखील फारच कमी लागत आहे. महाराष्ट्र राज्यात हे पहिलेच अवजार बनविण्यात आल्याची माहिती घोलप यांनी दिली. नवनाथ घोलप हे सध्या स्वतः या अवजाराचा वापर करत असून चार महिन्यात १५०० रुपये एकर या दराने ५१० एकर क्षेत्राची मशागत करण्यात आली आहे. या अवजाराने मशागत केल्यानंतर शेतकरी ही समाधान व्यक्त करत आहेत.
५५ एचपी च्या पुढील ट्रॅक्टर साठी लागणारे अवजार ५५ हजार रुपये किमतीला तर ३५ एचपी च्या ट्रॅक्टर साठी लागणारे अवजार ४५ हजार रुपये किमतीला विक्रीसाठी देण्यात येत आहे. इतर कंपन्यांच्या अवजारांपेक्षा या अवजाराची किंमत अत्यल्प आहे. तसेच शेतीच्या मशागतीसाठी लागणा-या खर्चात देखील बचत होत आहे. सदर अवजार बघण्यासाठी जिल्ह्यातून लोक येत आहेत. अवजाराची मागणी वाढली असून आजपर्यंत १५ अवजारांची बुकिंग झाली आहे.
नवनाथ घोलप या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांने बनविलेल्या या अवजाराची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. घोलप यांचा सत्कार युवा नेते अजय लामखडे, घनश्याम म्हस्के, बाबासाहेब लामखडे, संतोष गेरंगे, सागर कोतकर, अरुण धामणे, दत्तू निमसे, तेजस कर्डिले, गणेश कर्डिले, सतीश गेरंगे यांच्यासह निंबळक ग्रामस्थांनी केला आहे.
______________________________________________________
शेती व ट्रॅक्टर चालवता चालवता नवनवीन प्रयोग करण्याचा मला छंद आहे. त्यातून शेतकरी हितासाठी हे नविन अवजार बनविण्यात आले आहे. या अवजारामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणारच त्याचबरोबर मलाही काही प्रमाणात आर्थिक मदत होणार आहे.
...... नवनाथ घोलप (शेतकरी, निंबळक)
___________________________________
ग्रामीण भागातील नवनाथ घोलप यांनी बनविलेले शेतीसाठीचे अवजार अप्रतिम असून शेतकरी हिताचे ठरत आहे. या अवजारामुळे शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे. त्यांच्यातील कलेला वाव मिळण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार आहे.
....अजय लामखडे (युवा नेते)
_________________________________________
Post a Comment