नगरमध्ये पाच वाहनांच्या विचित्र अपघातात सात गंभीर



माय नगर वेब टीम 

नगर तालुका- नगर औरंगाबाद महामार्गावर पांढरीपूल येथे पाच वाहनांचा शुक्रवार दि. १९ रोजी झालेल्या विचित्र अपघातात सात जण जखमी झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली.

      याबाबत सविस्तर माहिती अशी की, पांढरीपूल येथील अमित बेकर्स समोर नगर कडून औरंगाबाद कडे जाणाऱ्या ट्रकने ( क्र. एम.पी. २० एच.बी. ५३४०) पुढे चाललेल्या पुणे- कळमनुरी एस.टी. बसला (क्र. एम.एच.२० बी. एल. ३५८४) जोराची धडक दिली. धडक इतक्या जोराची होती की एसटीची पाठीमागील बाजू पूर्णपणे तुटली आहे. एसटी मधील प्रवासी जखमी झाले.

      एसटीला पाठीमागून धडक दिल्याने एसटी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व पुढे चाललेल्या टाटा हारेर (क्र. एम. एच.१७ सी. आर. ३९६३) गाडीला एसटीने टक्कर दिली तर टाटा हारेर वाहनाने समोरील टाटा इंट्रा (क्र.एम.एच.१६ सी.डी. २६७८) या मालवाहतूक गाडीस धडक दिली. टाटा इंट्रा गाडी ही मध्यान्ह भोजन योजनेची होती. टाटा इंट्रा गाडी रस्त्यावर पलटी झाली या गाडीतील दोघेजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच एसटी बस खाली रस्त्याच्या कडेला उभी असलेली दुचाकी आल्याने तिचेही मोठे नुकसान झाले आहे.

     अपघातात एकूण सात जण जखमी झाले असून त्यांच्यावर नगर येथील विविध रुग्णालयांनी उपचार सुरू आहेत. जखमींना रुग्णालयात पाठविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ काळे, महादेव औटी, संतोष बोरुडे, सोनईचे माजी सरपंच हरिभाऊ दरंदले, बडे मामा, अल्ताफ बेग यांनी मदत केली. अपघातानंतर सोनई पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.

पांढरीपूल घाटातून अवजड वाहने डिझेल वाचविण्याच्या प्रयत्नात गाडी न्यूट्रल करतात. घाटातील तीव्र उतार व अवजड वाहनामुळे गाडीवर नियंत्रण मिळविणे अवघड होत असल्याने येथे वारंवार अपघात घडत आहेत. आजचा अपघात देखील यामुळेच झाल्याची चर्चा होती.

 दुकानांसमोर अस्ता- व्यस्त वाहने

 पांढरीपुल येथील भेळ प्रसिद्ध असून येथे अनेक वाहने थांबलेली असतात. दुकानदारांसमोर अस्ता -व्यस्त वाहने लावल्याने देखील अपघात घडत आहेत. दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर लागणारे वाहन शिस्तबद्ध पद्धतीने पार्किंग होईल याची काळजी घेण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post