माय नगर वेब टीम
अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द शिवारातील मोठेबाबा परिसरात गुरुवारी मध्यरात्री आई-वडिलासमवेत कोपीत झोपलेल्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केला. कोपितील चिमुरड्याला बिबट्याने ओढून नेले. मात्र ऊसतोड मजूर बिबट्यामागे पळाला. त्यामुळे बिबट्याने जबड्यात उचललेल्या चिमुरड्याला वाचविण्यात यश आले. हा चिमुरडा मात्र गंभीर जखमी झाला आहे.
साखर कारखाने सुरु झाल्यामुळे आश्वी खुर्द शिवारातील मोठेबाबा येथे जळगाव येथून आलेले संगमनेर साखर कारखान्याचे ऊसतोड मजूर अड्डा करुन राहत आहेत. गुरुवारी ऊसतोड मजूर आपल्या कोप्यांमध्ये झोपलेले असताना मध्यरात्री बिबट्याने ऊसतोड मजूराच्या कोपीत निर्धास्त झोपलेला चिमुकला वीरु अजय पवार याला जबड्यात घेऊन शंभर ते दीडशे फुटावर पलायन केले. त्याच दरम्यान चिमुकला जोरात ओरडल्यामुळे आई वडिलासह शेजारील ऊसतोड मजूरांनी बिबट्याचा थरारक पाठलाग करत त्याच्या जबड्यातून या चिमुकल्याची सुटका केली.
या चिमुकल्याच्या मानेवर खोलवर जखमा झाल्यामुळे मोठा रक्तस्राव होत असल्याने त्याला प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्यानंतर अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
Post a Comment