शेंडी बायपास चौकातील अपघातांची मालिका सुरूच
माय नगर वेब टीम
अहमदनगर - नगर औरंगाबाद महामार्गावरील शेंडी बायपास चौकात रविवार दि. ६ रोजी पहाटे दोनच्या सुमारास झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार तर एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, औरंगाबाद कडून नगर कडे जाणाऱ्या ट्रकला (क्र. एम. एच.४३ वाय ७७४०) पाठीमागून कंटेनरने (क्र. एम. एच. १२ जे.एस. ९१९९) जोरदार धडक दिल्याने अपघात घडला. हा अपघात शेंडी बायपास चौकात घडला असून धडक इतकी भीषण होती की कंटेनरच्या केबिनचे संपूर्णपणे नुकसान झाले आहे.
कंटेनर मध्ये लोखंडी सळया असल्याने त्या केबिनमध्ये घुसल्याने कंटेनर मधील कृष्णा रघुनाथ सानप ( वय २५ रा. रामनगर ता. गेवराई जिल्हा बीड) व एका अज्ञात इसमाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. तर चौकात बंदोबस्तासाठी असणारे पोलीस कर्मचारी संभाजी खलाटे जखमी झाल्याची माहिती मिळाली. वाहतुक बंदोबस्तासाठी असणारे पोलिसांनी तत्परता दाखवत बाजूला गेल्याने ते बचावले.
शेंडी बायपास चौकात अपघातांची मालिका सुरूच आहे. मागील पंधरा दिवसापूर्वी घडलेल्या अपघातात बहिरवाडी येथील चार वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यावेळी संतप्त ग्रामस्थांनी तीव्र रास्ता रोको आंदोलन करत येथे सिग्नल व इतर उपाययोजना करण्याची मागणी केली होती.
अपघातानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे व त्यांच्या सहकार्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान शेंडी बायपास चौकात वारंवार अपघात घडत आहेत. त्यामुळे तिथे सिग्नल व अपघात टाळण्यासाठी इतर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Post a Comment