थंडीन महाराष्ट्र कुडकुडला; महाबळेश्वरला निचांकी तापमान

 


माय अहमदनगर वेब टीम 

मुंबई - देशाच्या उत्तर भागात थंडीनं चांगलाच जम बसवल्याचं पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरच्या बहुतांश भागांमध्ये बोचरी थंडी जाणवू लागली असून, काही भागांमध्ये हिमवृष्टीलाही सुरुवात झाली आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये आलेल्या या थंडीच्या लाटेचे परिणाम महाराष्ट्रातही जाणवू लागले आहेत. पुणे , सातारा या भागांमध्ये तापमानात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई, नवी मुंबई भागातही रात्रीच्या तापमानात घट झाल्याचं स्पष्टपणे लक्षात येतंय.


रविवारी पुण्यामध्ये तापमान 12.7 अंश इतकं होतं. तर, सोमवारी तापमानाचा हाच आकडा निफाडमध्ये 11.8 अंशावर पोहोचला आहे. देशात्या उत्तर भागांतील बहुतांश राज्यांमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे मध्यप्रदेशसह महाराष्ट्रातही पारा उतरला आहे.



विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह कोकण आणि गोव्यातही थंडीला सुरुवात झाली. आंबोली घाट परिसरात किमान तापमान 17 अंश, तर कोल्हापूरातही किमान कापमान 17 अंश सेल्सिअस इतकं असेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला.


राज्यातील महत्त्वाच्या गिरिस्थानांपैकी एक असणाऱ्या महाबळेश्वर येथेही किमान तापमान 13 अंशांपर्यंत पोहोचलं आहे. सध्याचं हवामान आणि कोरोनाचे शिथिल करण्यात आलेले निर्बंध पाहता पर्यटनाच्या दृष्टीनं अनेकांनीच वाई, पाचगणी, भिलार, भोसे, महाबळेश्वर भागांना भेट देण्याचे बेत आखले आहेत.



हवेत असणारा आल्हाददायक गारवा, सकाळच्या वेळेत रस्त्यांवर दरीतून येणारं धुकं आणि एकंदर वातावरण पाहता महाबळेश्वरच्या दिशेनं येणाऱ्यांची संख्या येत्या दिवसांमध्ये वाढणार आहे.


साथीच्या रोगांचा धोका

सकाळच्या वेळेत असणारं कडाक्याचं ऊन आणि संध्याकाळच्या वेळेत तापमानात होणारी घट पाहता साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असल्यामुळं त्या धर्तीवरही काळजी घेतली जाणं गरजेचं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असणाऱ्या नियमांमध्ये आलेल्या शिथिलतेमुळे नागरिकांनी बेजबाबरादपणे वागू नये असं आव्हान आरोग्य विभागाकडून करण्यात येतंय. बदलत्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांची काळजी घेण्याचा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.


 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post