वाळुंज येथील नवीन ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन
माय नगर वेब टीम
अहमदनगर - गेल्या ७-८ वर्षांपासून केंद्र शासनाकडून मिळणारा वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतच्या खात्यात वर्ग होत असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना निधी कमी प्रमाणात मिळत आहे. तरीही शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून वाळकी जिल्हा परिषद गटात प्रत्येक गावामध्ये मुलभूत सोयी-सुविधांसाठी भरीव निधी देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे वाळकी गटातील गावे ही विकास कामांमध्ये नगर तालुक्यात अग्रेसर दिसत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ यांनी केले.
नगर तालुक्यातील वाळुंज येथे जनसुविधा विशेष अनुदान योजनेअंतर्गत १५ लाख व ग्रामनिधीतून १० लाख असे २५ लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या नवीन ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन हराळ यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास सरपंच विजय शेळमकर, उपसरपंच नलिनी पाडळे, महादेव शेळमकर, बाळासाहेब दरेकर, मकरंद हिंगे, अनिल मोरे, अमोल गायकवाड, प्रा.अजय दरेकर, प्रा.जगन्नाथ हिंगे, हनुमंत काकडे, अविनाश शिंदे, कुंदन शिंदे, ग्रामसेविका श्रीमती बरबडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना बाळासाहेब हराळ म्हणाले, वाळकी गटात गेल्या ५ वर्षाच्या कालावधीत जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन समितीसह विविध शासकीय योजनांकडून मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्यात आली आहेत. गटातील प्रत्येक गावात विविध विकासकामांसाठी निधी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात वाळुंज गावाला सर्वाधिक निधी दिलेला आहे. गावातील स्मशानभूमीचे केलेले सुशोभीकरण परिसराचे आकर्षण ठरले आहे. ग्रामपंचायत कार्यालयात सर्व सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी पुढील काळात आणखी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच यापुढील काळात गटातील विविध गावांमधील वाड्या-वस्त्यांना जोडणार्या रस्त्यांचे प्रलंबीत प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Post a Comment