पांगरमल शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
माय नगर वेब टीम
नगर तालुका- विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर मैदानी खेळाकडे लक्ष देण्याची गरज आहे. मैदानी खेळामुळे आरोग्य सदृढ राहते असे प्रतिपादन पांगरमल गावचे सरपंच बापूसाहेब आव्हाड यांनी केले आहे.
नगर तालुक्यातील पांगरमल येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सन २०२१-२२ च्या शिष्यवृत्ती परीक्षेत जेऊर केंद्रांतर्गत भरघोस यश संपादन केले आहे. जेऊर केंद्रांतर्गत पांगरमल शाळेने प्रथम क्रमांक मिळविला आहे. पांगरमल शाळेतील शिष्यवृत्ती परीक्षेत १६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर कृष्णा शिवनाथ आव्हाड व अस्मिता सुखदेव आंधळे या दोन विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. त्यांच्या यशाबद्दल पांगरमल ग्रामपंचायतच्या वतीने यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
त्यावेळी बोलताना सरपंच बापूसाहेब आव्हाड यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांनी कात टाकली असून या शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवण्यासाठी शाळेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर मैदानी खेळाकडे लक्ष देण्याची गरज आहे. आजचे विद्यार्थी मैदानी खेळ विसरत चालले असून मोबाईल मध्ये गुरफटत असल्याची खंत सरपंच आव्हाड यांनी व्यक्त केली. मैदानी खेळामुळे आरोग्य सदृढ राहते त्यामुळे विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळलेच पाहिजे असेही आव्हाड यांनी सांगितले.
याप्रसंगी मुख्याध्यापक बाळासाहेब म्हस्के, शिक्षक महादू उधार, संगीता गोसावी, सविता बोरकर, विद्या कडे, रूपाली देशमुख, उज्वला म्हस्के, देविदास आव्हाड, चेअरमन गणपत आव्हाड, महादेव आव्हाड, सतीश आव्हाड, संतोष आव्हाड, साहेबराव आव्हाड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याने त्यांना प्रोत्साहन मिळत असते. त्यांच्यातील सुप्तगुणांना वाव मिळण्यासाठी शाळेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे याच उद्देशाने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
...बापूसाहेब आव्हाड ( सरपंच, पांगरमल)
Post a Comment