पोलिसांनी 24 लाखांचा गांजा पकडला; असा केला पाठलाग

  


माय नगर वेब टीम 

संगमनेर:-संगमनेरमध्ये १७२ किलो गांजासह तब्बल २४ लाखाच्या माध्यमातून हस्तगत केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपीना अटक केली असून या गांजाप्रकरणी सखोल तपास करून याची पाळेमुळे शोधण्याचे आव्हान शहर पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.


संगमनेर शहरानजीक कोल्हार-घोटी राज्यमार्गावर समनापुर शिवारात शहर पोलिसानी ही कारवाई केली.एका ब्रिझा

कारमधून कोल्हार घोटी मार्गावरील लोणी कडून संगमनेरच्या दिशेने गांजा आणला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यामुळे पोलिसांचे पथक संशयित वाहनाची तपासणी करण्यासाठी समनापुर जवळील नसीब वडापाव सेंटर जवळ थांबले होते.संशयास्पद ब्रिझा कार (एम.एच.50 एल 9970) तेथे आली असता पोलिसानी कार चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.पोलीस पथकाने कारची तपासणी केली असता त्यामध्ये त्याना १५ लाख ५५ हजार ७४० रुपये किमतीचा उग्रवास असलेला १७२ किलो ८० ग्राम गांजा आढळून आला.


त्यामुळे संशयितानी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस बळापुढे त्याचे प्रयत्न फोल ठरले. पोलिसांनी कारमधील दोघा संशयीतासह त्यांच्याकडील मोबाईल.आणि कार असा सुमारे २४ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणला.पोलीस ठाण्यात आल्यानंतर आरोपी संदीप लक्ष्मण भोसले (वय 35 वर्षे, रा. मलकापूर, ता. कराड, जि. सातारा) आणि बाळासाहेब भाऊसाहेब शिंदे (वय 30 वर्ष रा, वडगाव सावताळ, ता. पारनेर जि. अहमदनगर) या दोघा आरोपी विरोधात पोलीस उपअधीक्षकांच्या कार्यालयातील पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक निवांत जाधव पुढील तपास करत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post