माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका- नगर तालुक्यातील पांगरमल ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा प्रचार सुरू असून सरपंच बापूसाहेब आव्हाड यांनी स्वतः सरपंच असताना केलेल्या सर्व विकास कामांची चौकशी करण्याची मागणी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच विरोधकांकडून चुकीचा, पत घालविण्याचा प्रचार सुरू असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील सरपंच आव्हाड यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केल्याने खळबळ उडाली आहे.
पांगरमल गावात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यातच विरोधकांकडून चुकीचा व अब्रू घालण्याचा प्रचार होत असल्याची तक्रार आव्हाड यांनी केल्याने पांगरमल गावची निवडणूक चांगलीच गाजणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
याबाबत सरपंच बापूसाहेब आव्हाड यांनी दिलेल्या निवेदनात सरपंच पदाच्या कार्यकाळात गावात विविध विकास कामे केली आहेत. कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करता गावाप्रती सेवा भाव ठेवून गाव विकासाचे निर्णय घेतले. त्यामुळे येथील सर्वसामान्य जनतेने मला दोन पंचवार्षिक सेवा करण्याची संधी दिली. चालू निवडणुकीत मी सरपंच पदासाठी उमेदवार आहे. परंतु सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी उभी असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली व चुकीची तसेच जनतेची दिशाभूल करण्याचे काम विरोधकांकडून सुरू करण्यात आल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे.
सरपंच पदाच्या कार्यकाळात केलेल्या कामांच्या नावाखाली अपहार केल्याचा आरोप माझ्यावर करण्यात येत आहे. विरोधकांनी मी केलेल्या विकास कामांचे पॅम्प्लेट छापून ते गावात वितरित करून माझी बदनामी करण्याचे षडयंत्र सुरू केले आहे. विकास कामांचा खर्च हाच भ्रष्टाचाराचा आकडा दाखवून जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे. अशा चुकीच्या प्रचारावर बंदी घालण्यात यावी व स्वतः केलेल्या विकास कामांच्या खर्चाची चौकशी लावण्यात यावी अशी मागणी खुद्द सरपंच बापूसाहेब आव्हाड यांनीच केली आहे.
______________________________________
अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार
विरोधकांकडून चुकीची व जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. गावातील विकास कामांबद्दल मी अपहार केल्याचा आरोप माझ्यावर करण्यात येत आहे. तो संपूर्णतः चुकीचा असून त्याबाबत मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे.
...... बापूसाहेब आव्हाड ( सरपंच पांगरमल )
____________________________________
स्वतःच्या कामाची चौकशी लावण्याची पहिलीच घटना
पांगरमल गावात सरपंच म्हणून कार्यरत असताना केलेल्या विविध विकास कामांची चौकशी लावण्यात यावी अशी मागणी सरपंच बापूसाहेब आव्हाड यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. स्वतः केलेल्या कामाची चौकशी लावण्याची मागणी करण्याची ही तालुक्यातील पहिलीच घटना आहे.
______________________________________
Post a Comment