महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा /पुण्यात रंगला ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार
माय अहमदनगर वेब टीम
पुणे - पुण्यात आज(शनिवार) ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगला. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची मानाची गदा पटकवण्यासाठी महेंद्र गायकवाड विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यात लढत झाली. यामध्ये शिवराज राक्षे याने महेंद्र गायकवाडला चितपट करून विजयी झाला.
नांदेडचा शिवराज राक्षे आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या लढतीमध्ये शिवराजने एका मिनिटात महेंद्राला चितपट करत ‘महाराष्ट्र केसरी’च्या मानाच्या गदेवर नाव कोरले. शिवराजने माजी विजेत्या हर्षवर्धनला ८-१ असे पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. तर महेंद्रने वाशिमच्या सिकंदर शेखचा ६/४ असा पराभव केला होता.
महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या आखाड्यात झालेल्या अंतिम सामन्यात शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडवर मात करत चांदीची गदा उंचावली आहे. शिवराजने महेंद्र गायकवाडचा पराभव करत हा विजय मिळवला आहे. या विजेतेपदानंतर आता शिवराज राक्षेला महिंद्रा थार जीप व रोख रक्कम पाच लाखांचे बक्षीस देण्यात आले आहे. तर उपविजेता ठरलेल्या महेंद्र गायकवाडला ट्रॅक्टर व रोख अडीच लाखाचे बक्षीस मिळाले.
या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ब्रिजभूषण सिंह, भाजपा मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडामंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती होती.
अंतिम फेरीत पोहचलेले दोन्ही मल्ल हे पुण्याच्या एकाच तालमीत तयार झालेले आहेत. वस्ताद काका पवार व गोविंद पवार यांच्या कात्रजमधील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल तालमीतील हे कुस्तीपटू आहेत.
Post a Comment