माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका- शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज मिळण्याची गरज असून त्यासाठी रोहित्रांवरील ओव्हरलोड कमी करून नवीन रोहित्र बसविण्यात यावे. ओव्हरलोड मुळे शेतकरी वर्ग वैतागला असून त्यांना पूर्ण दाबाने वीज मिळावी. यासाठी विद्युत वितरण कंपनीने योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत निंबळक सरपंच सौ. प्रियंका लामखडे यांनी व्यक्त केले.
नगर तालुक्यातील निंबळक येथे नवीन रोहित्राचे उद्घाटन सरपंच सौ. प्रियंका अजय लामखडे यांच्या हस्ते सहाय्यक अभियंता दुर्गेश साखरवडे, व्हाईस चेअरमन अविनाश आळंदीकर, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ खांदवे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी बोलताना सरपंच प्रियंका लामखडे यांनी सद्यस्थितीत विविध रोहित्रांवर ओव्हरलोड आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज मिळत नाही. विद्युत पंप चालत नाहीत. त्यामुळे शेतकरी वर्ग वैतागला आहे. त्यासाठी विद्युत वितरण कंपनीने सर्वत्र सर्वे करून ओव्हरलोड कमी करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज पुरवठा करावा असे सौ. लामखडे यांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक सहा मधील कळसे वस्ती येथील रोहित्र ओव्हरलोड होते. त्यामुळे परिसरातील शेतकरी वैतागलेले होते. ओव्हरलोड कमी करून नव्याने जाजगे वस्ती येथे रोहित्र बसविण्यात आले आहे. परिसरातील ओव्हरलोड कमी होऊन सर्वांना पूर्ण दाबाने वीज पुरवठा होणार असल्याने नागरिकांनी ही समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी बाबासाहेब पगारे, दत्ता पाटील कोतकर, अशोक शिंदे, रावसाहेब जाजगे, किरण कळसे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
_______________________________________________
Post a Comment