रायगड प्रतिनिधी -१०८ रुग्णवाहिका ही सर्वसामान्य गोरगरीब जनतेला दिलासा देणारी सेवा ठरत असल्याचे प्रतिपादन रुग्णवाहिकेच्या रायगड उपजिल्हा व्यवस्थापक सौ. कांचन बिडवे (आहेर) यांनी केले आहे.
भिरा येथील टाटा पॉवर कंपनीतील कर्मचाऱ्यांना १०८ रुग्णवाहिकेबाबत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपजिल्हा व्यवस्थापक कांचन बिडवे यांनी १०८ रुग्णवाहिकेच्या सेवेबद्दल कर्मचाऱ्यांना सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले. रुग्णवाहिकेची सेवा बीव्हीजी ग्रुप व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने २०१४ पासून सुरू करण्यात आलेली आहे. रुग्णवाहिकेमुळे अपघातातील अनेक जखमींचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. तसेच गोरगरीब जनतेला मोफत सेवा मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिक १०८ रुग्णवाहिकेच्या सेवेबद्दल समाधान व्यक्त करत आहेत. रायगड जिल्ह्यात रुग्णवाहिकेच्या सेवेचे काम नियोजनबद्ध तसेच उत्कृष्टपणे सुरू असल्याची माहितीही बिडवे यांनी दिली.
डॉ. अतुल काळे यांनी रुग्णवाहिकेत उपलब्ध असलेल्या सुविधा, औषधे तसेच त्यांचा वापर याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी पायलट गजानन दळवी, नागेश भोर देखील उपस्थित होते. टाटा पॉवर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या १०८ रुग्णवाहिकेच्या सेवेचे कौतुक केले तसेच कंपनी कर्मचाऱ्यांना केलेल्या मार्गदर्शनाबद्दल सर्वांचे आभार मानले.
--------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातही कांचन बिडवे यांच्या कार्याचा ठसा
अहमदनगर जिल्ह्यात सौ कांचन बिडवे या १०८ रुग्णवाहिकेच्या सेवेत कार्यरत असताना त्यांनी आपल्या कार्यातुन ठसा उमटविला होता. विविध अपघात प्रसंगी कार्य तत्परता दाखवत अनेकांना जीवदान देण्यात बिडवे या नेहमीच पुढाकार घेत होत्या. त्यांनी आपल्या कार्यकाळात अहमदनगर जिल्ह्यात केलेल्या कार्याचा चांगला आदर्श जनतेसमोर ठेवला आहे.
_______________
Post a Comment