तुकडे करून भंगारात विल्हेवाट लावली जात असताना पोहोचले पोलिस ; दोघांना केली अटक
माय नगर वेब टीम
अहमदनगर - दुचाकी, चार चाकी वाहने चोरल्यानंतर त्या वाहनांची भंगारात विल्हेवाट लावली जात असल्याचा प्रकार नगर तालुका पोलिसांनी उघडकीस आणला आहे. नगरमधून चोरलेल्या ढंपरची नांदेडमध्ये एका भंगार दुकानात विल्हेवाट लावली जात असताना पोलिसांनी तेथे छापा टाकत दोघांना ढंपरसह ताब्यात घेवून नगरला आणले आहे. न्यायालयाने दोघांना ४ दिवस पोलिस कोठडी दिली असून पोलिस आता त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथील ज्ञानेश्वर बाळु कुंजीर यांनी त्यांच्या मालकीचा ढंपर (क्र.एम एच १६ क्यु ७९७८) हा दि. ३० सप्टेबर रोजी रात्री नगर – दौंड रोडवरील अरणगाव (ता. नगर) बायपास चौकाजवळील इसार पेट्रोल पंपाजवळ पार्क केलेला होता. रात्री ८.३० ते दि.१ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान सदरचा ढंपर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. याबाबत त्यांनी दुपारी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्या ढंपरला जीपीएस सिस्टीम असल्याने स.पो.नि. शिशिरकुमार देशमुख यांनी तातडीने ढंपरचा शोध घेण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक युवराज चव्हाण, पोलिस अंमलदार कमलेश पाथरूट, सुभाष थोरात, संभाजी बोराडे, सागर मिसाळ यांचे पथक तयार करून रवाना केले.
जीपीएस सिस्टीम व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे काढला माग
या पथकाने जीपीएस सिस्टीमच्या लोकेशन नुसार नगर ते माजलगाव (जि. बीड) पर्यंत ढंपरचा माग काढला. तेथून पुढे लोकेशन मिळेना. त्यामुळे पोलिसांनी ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासत पुढे पुढे गेले. त्यावेळी सदर ढंपर हा नांदेड पर्यंत गेल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे उपनिरीक्षक चव्हाण यांनी नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेत असलेल्या त्यांच्या परिचयाच्या अधिकारी व अंमलदारांना याची कल्पना दिली. नगर पोलिसांचे पथक नांदेड मध्ये गेल्यावर तेथील पोलिसांच्या मदतीने ढंपरचा शोध सुरु करण्यात आला. अखेर एका भंगार दुकानात त्या ढंपरची तोडफोड सुरु असल्याचे पोलिस पथकाला दिसले.
पोलिसांनी तेथे तात्काळ छापा टाकत गजानन संभाजी भोसले (वय ३३, रा. सुहागन, ता. पूर्णा, जि. परभणी) व अख्तरखां ताहेरखां पठाण (वय ५५, रा. पीरबुऱ्हाणनगर, नांदेड) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या कडे सखोल चौकशी केल्यावर सदरचा ढंपर हा गजानन भोसले याने नगरमधून चोरून नांदेड येथे नेवून पठाण याला भंगारात विकला असल्याचे समोर आले.
पोलिसांनी दोघांना ढंपरसह ताब्यात घेत बुधवारी (दि.४) पहाटे नगरला आणले. दुपारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना ४ दिवस पोलिस कोठडी दिली. आता पोलिस त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेत असून या आरोपींनी यापूर्वी काही वाहने चोरून त्यांची अशा प्रकारे विल्हेवाट लावली की काय? याची माहिती घेत आहेत. पुढील तपास महिला पो.हे.कॉ. के.एस. हरिश्चंद्रे या करत आहेत.
Post a Comment