"ते" पान स्टॉल अखेर पोलिसांनी पुन्हा केले बंद, परवाना रद्दसाठी नोटीस
माय नगर वेब टीम
अहमदनगर : सिताराम सारडा विद्यालयाजवळ असणारी ती बहुचर्चित पान टपरी पुन्हा गाळ्यात सुरू झाली होती. मात्र शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना आंदोलनाचा इशारा देताच जिल्हा प्रशासन, पोलीस, मनपा, सहाय्यक कामगार आयुक्त, तसेच अन्न व औषध प्रशासन खडबडून जागे झाले असून अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी ते पान स्टॉल सुरू असणारा गाळा कारवाई करत गुरुवारी दुपारी पुन्हा बंद केला आहे. दरम्यान, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाने त्या हनुमान पान स्टॉलला परवाना रद्द करणे बाबत नोटीस जारी केली आहे.
कारवाईबद्दल माहिती देताना मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर किरण काळे यांनी तोफखाना पोलीस निरीक्षक, मनपा अतिक्रमण विभाग प्रमुख, सहाय्यक कामगार आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सुरक्षा अधिकारी यांच्याशी मंगळवारी दिवसभर संपर्क साधत शाळेतील विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्त परिसर मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश आले आहे. सर्व विभागांच्या वतीने करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईमध्ये सिताराम शाळा विद्यालयासह न्यू आर्ट्स कॉलेज, रेसिडेन्शिअल कॉलेज व शाळा परिसरातील तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या टपऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेसच्या दणक्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
माजी नगरसेवक संजय झिंजे अधिक माहिती देताना म्हणाले, तोफखाना पोलिसांनी कोफ्टा कायदा अंतर्गत सदर पान टपरीवर दंडात्मक कारवाई केली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने शुक्रवारी सदर बहुचर्चित गाळ्याची पाहणी करण्यात येणार येणार असून या विभागाच्या वतीने देण्यात आलेला परवाना देखील रद्द केला जाईल असे आश्वासन सुरक्षा अधिकारी बडे यांनी जिल्हाध्यक्ष काळे यांना दिले आहे. तसेच पुढील दोन दिवस तोफखाना व कोतवाली हद्दीत कारवाई सुरू राहणार असल्याचे आश्वासन मनपा अतिक्रमण विभागाने काँग्रेसला दिले आहे.
परवाना रद्दची नोटीस :
तोफखाना पोलिसांनी सहाय्यक कामगार कार्यालयास सदर पान टपरीचा परवाना रद्द करण्यासाठी पत्र दिले होते. त्यानंतर संयुक्त पाहणी करुन हनुमान पान सेंटरने सूचना पावती तीन दिवसांत रद्द करून कार्यालयास कळविण्यात यावे अशी दुकाने निरीक्षकांनी नोटीस काढली आहे. अन्यथा महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ व नियम २०१७ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सुचित करण्यात आले आहे. तशी माहिती सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कवले यांनी दिली आहे.
आंदोलन स्थगित :
दरम्यान, प्रशासनाच्या वतीने धडक कारवाई करण्यात आल्यामुळे सोमवारी पालकमंत्र्यांच्या शासकीय कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने करण्यात येणारे ढोल बजाओ आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती काँग्रेस कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे यांनी दिली आहे. प्रशासनाच्या कारवाईचे काँग्रेसने स्वागत करत आहे. मात्र यामध्ये सातत्य राहणे गरजेचे आहे. ते न राहिल्यास पुन्हा काळेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आक्रमक भूमिका घेईल, असे ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी म्हटले आहे
काळेंचे सर्व स्तरातून कौतुक :
हेरंब कुलकर्णी हल्ला प्रकरणानंतर शाळा, महाविद्यालयांना तंबाखूमुक्त परिसर करण्यासाठी काँग्रेसच्या माध्यमातून किरण काळेंच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या आक्रमक भूमिकेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पहिल्यांदाच नगर शहरामध्ये राजकीय नेतृत्वाच्या व राजकीय पक्षाच्या वतीने अशा प्रकारची आक्रमक भूमिका शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक यांच्या हिताच्या दृष्टीने आणि अवैध धंद्यांच्या विरोधात घेण्यात आली आहे. त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे.
Post a Comment