जास्त पैशांचा मोह भोवला; 24 लाखांना लागला चुना



 अहमदनगर  - शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणुकीतून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका खासगी नोकरदाराची 24 लाख 25 हजार रूपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी (दि. 26) सायंकाळी येथील सायबर पोलीस ठाण्यात व्हॉट्सअ‍ॅप नंबर धारक रजतसिंग रजपुत नामक व्यक्तीविरोधात फसवणूक, आयटी अ‍ॅक्ट कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमित नंदकिशोर कुलकर्णी (वय 40 रा. बडोदा बँक कॉलनी, सुडके मळा, बालिकाश्रम रस्ता, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. सदरची घटना 6 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान घडली आहे. कुलकर्णी खासगी नोकरी करतात. त्यांना एका व्हॉट्सअ‍ॅप नंबरवरून रजतसिंग रजपुत नामक व्यक्तीने संपर्क केला. शेअर ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. रजपुत याने कुलकर्णी यांचा विश्‍वास संपादन केला. कुलकर्णी यांनी देखील रजपुतवर विश्‍वास ठेऊन त्याला ट्रेडिंगसाठी वेळोवेळी पैसे दिले. त्यांनी 6 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान एकुण 24 लाख 25 हजार रूपये दिले.

दरम्यान, रजपुत याने कुलकर्णी यांना ट्रेडिंगमधील नफा दिला नाही. त्याला वेळोवेळी संपर्क करून देखील त्याने प्रतिसाद दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे कुलकर्णी यांच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी येथील सायबर पोलीस ठाणे गाठून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी रजपुत नामक व्यक्तीविरोधात फसवणूक, आयटी अ‍ॅक्ट कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post