शिवपुत्र संभाजी महानाट्याची तयारी अंतिम टप्यात; लंके प्रतिष्ठानचे तगडे नियोजन

 


■ १ मार्च रोजी शुभारंभ / आ. नीलेश लंके यांच्याकडून तयारीचा आढावा

माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर - आ. नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या वतीने नगरच्या नेमाणे इस्टेट येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून आ. नीलेश लंके यांनी या तयारीचा बुधवारी आढावा घेतला.


दि. १ ते ४ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या महानाट्यासाठी दररोज साठ हजार प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था करण्यान आली असून नगर दक्षिण मतदारसंघातील विविध तालुक्यांसाठी व नगर शहरासाठी वेगवेगळ्या विषशी आयोजन करण्यात आले आहे. दक्षिण नगर जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये महानाट्याच्या प्रवेशिका पोहचविण्यात आल्या असून आ. लंके यांची यंत्रणा रात्रंदिवस नियोजनासाठी झटत आहे.


खा. डॉ. अमोल कोल्हे हे या महानाट्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भुमिका करणार असून १ ते ४ मार्च दरम्यान दररोज सायंकाळी सहा वाजता महानाट्याच्या प्रयोगास सुरुवात होणार आहे. दोन तास ४० मिनिटांचे हे ऐतिहासिक महानाट्य आहे. डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह ज्येष्ठ कलाकार राजन बाने हे औरंगजेबाची भुमिका साकारणार आहेत. तर स्नेहलता वसईकर, महेश कोकाटे, विश्वजीत फड़ते, अजय तापकीरे, रमेश कोरडे हे सिनेकलाकारही महानाट्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारणार आहेत. दिडशेहून अधिक स्थानिक कलाकारांनाही या महानाटयामध्ये संधी देण्यात आली आहे.


जगदंब क्रिएशन व महाराजा शंभू छत्रपती प्रोडक्शनच्या स्वराज्याच्या छाव्याचा धगधगता इतिहास मांडणाऱ्या या ऐतिहासिक महानाट्याचे लेखक आणि दिग्दर्शक महेंद्र वसंतराव महाडीक हे आहेत.


शहर व तालुकानिहाय नियोजन

दि. १ मार्च नगर शहरातील प्रभाग १४, १५, १६, १७ पारनेर तालुक्यातील जि. प. चा सुपा व ढवळपुरी गट व श्रीगोंदे तालुक्यातील सर्व गावे.


दि. २ मार्च नगर शहरातील प्रभाग १०, ११, १२, १३ भिंगार, पारनेर तालुक्यातील कान्ह्रपठार गट, टाकळीढोकेश्वर गट, पारनेर शहर, कर्जत व जामखेड तालुक्यातील सर्व गावे.

दि. ३ मार्च नगर शहरातील प्रभाग क्र.६,७,८,९ नगर मतदारसंघातील ४३ गावे, शेवगांव व पाथर्डी तालुक्यातील सर्व गावे.

दि. ४ मार्च नगर शहरातील प्रभाग क्र. १.२.३.४.५ नगर तालुक्यातील ४३ गावांव्यतिरिक्त उर्वरीत गाये, राहुरी तालुक्यातील गाये.


आ. लंके यांची यंत्रणा अॅक्टीव्ह मोडवर

महानाटयाची घोषणा झाल्यापासून आ. नीलेश लंके यांची जिल्ह्यातील यंत्रणा अॅक्टीव्ह मोडवर आली असून जिल्ह्यातील तब्बल ५ हजार कार्यकत्यांनी फळी वेगवेगळ्या नियोजनाची जबाबदारी पार पाडत आहे. नगर दक्षिण जिल्हयाच्या प्रत्येक गावामध्ये जात लंके यांच्या कार्यकर्त्यांनी प्रवेशिका घरोघर पोहच केल्या असून दररोज आ. लंके हे कार्यकर्त्यांकडून कामाचा आढावा घेत आहेत.


१२० फुट किल्ल्याचा रंगमंच

या महानाट्यासाठी १२० फुट किल्ल्याचा रंगमंच तयार करण्यात आला असून खरी खुरी लढाई, हत्ती, घोडे, बैलगाड्या, २६ फुटी जहाजावरून जंजिरा मोहिम, चित्तथरारक घोडेस्वारी, संपूर्ण मैदानाचा रंगमंच म्हणून वापर करण्यात येणार आहे.


डॉ. कोल्हे यांची चित्तथरारक घोडेस्वारी

या महानाटयामध्ये डॉ. अमोल कोल्हे यांची मैदानातून चित्तथरारक घोडेस्वारी पहावयास मिळणार आहे. महानाट्यासाठी १५० फुट लांब ८० फुट संद व ५ मजली किल्ल्याची हुबेहुब प्रतिकृतीचा ६७ लाख रूपये खर्चाचा सेट उभारण्यात आला आहे. महानाट्यासाठी २० लाख रूपयांची राजेशाही ड्रेपरी, ४ लाखांचे शस्त्रास्त्रे आणि युध्द साहित्य वापरण्यात येणार आहे.


एकदा तरी महानाटय पहा

स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींचा इतिहास भावी पिढीला समजावा आणि त्यातून प्रेरणा घेण्यासाठी एकदा तरी हे महानाट्य पहावे.

खा. डॉ. अमोल कोल्हे

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post