माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - मीटरने पाणीपुरवठा, उपनगरात भुयारी गटार योजनेचे काम, सीएसआर निधीतून कामे यासह कर वाढ न करता मनपाने बजेट जाहीर केले आहे. यावर शहर काँग्रेसने सडकून टीका केली आहे. मनपाचे बजेट हे गोलमाल बजेट असून सर्वसामान्य नगरकरांची घोर निराशा करणारे आहे. रु. १५६० कोटींचे पोकळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. नगरकरांवर रु. १५० कोटींच्या कर्जाचा बोजा टाकण्याचा घाट बजेटच्या आडून घातला गेला असल्याचा आरोप शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे.
मनपावर प्रशासकराज असले तरी सत्ताधारी सरकारचा आणि त्याच्या स्थानिक प्रतिनिधींचा मनपा प्रशासनावर पूर्ण प्रभाव आहे. राजा बोले, दल हाले अशी स्थिती मनपात आहे. नगरकरांचे प्रश्न सोडविणे, मूलभूत सोयी सुविधा पुरविणे ही कामे मनपा करत नसून ठेकेदार पोसणे, भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणे ही कामे होत आहेत. मनपा ही रिमोट कंट्रोलवर चालते असे म्हणत काँग्रेसच्या वतीने काळे यांनी मनपाच्या बजेटचे पोस्टमार्टम केले आहे.
किती कोटींचा सीएसआर निधी आणला ? :
बजेटमध्ये सीएसआर फंडातून कामे करण्यावर भर दिला जाणार असल्याचे म्हटले आहे. त्यातून शाळांची दुरुस्ती व नव्याने शाळा बांधणी प्रस्थावित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यापूर्वी देखील बजेटमध्ये हीच गोष्ट सांगितली गेली होती. तसेच लोकप्रतिनिधींनी देखील सीएसआर निधीतून मनपा विकासाची कामे करण्याच्या अनेक वेळा घोषणा केल्या होत्या. त्याचे पुढे काय झाले ? प्रत्यक्षात आजवर किती कोटींचा सीएसआर निधी मनपाच्या खात्यात जमा झाला, त्यातून काय कामे केली हे मनपाने आधी सांगावे. मनपावर भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप आहेत. त्यामुळे या सर्व भूलथापा असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.
मनपाच्या शाळा आहेत काय ? :
साधी शिक्षणाची सुद्धा सुविधा मनपा देऊ शकत नाही. मात्र मनपा शाळा डिजिटल करण्यात येतील असे बजेटमध्ये म्हटले गेले आहे. मनपाच्या शहरात शाळा किती आहेत ? त्यात विद्यार्थी किती आहेत ? हे नगरकरांना मनपाने आधी सांगावे. भूतकाळात मनपाच्या किती शाळा होत्या, त्यातल्या किती बंद झाल्या आणि आज प्रत्यक्षात किती शाळा कार्यान्वित आहेत हे सांगावे. मनपाच्या अकार्यक्षमतेमुळे मनापाच्या तेवढ्या शाळाच आता शिल्लक राहिल्या नसल्यामुळे त्या डिजिटल करू हे म्हणणे म्हणजे बजेट अडून नगरकरांना खोट्या भूलथापा देणे असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.
नगरकरांना कर्जबाजारी का करता ? त्याऐवजी भ्रष्टाचार करू नका :
महापालिका विकास कामांसाठी पहिल्यांदाच कर्ज घेणार असल्याचे बजेटमध्ये म्हटले आहे. यापूर्वी देखील कर्ज घेण्याचे मनपाने ठरवले होते. केंद्र शासनाच्या मोठ्या योजनांचा मनपा हिस्सा भरण्यासाठी रू. १५० कोटींचे कर्ज घेण्याचे बजेटमध्ये सादर केले आहे.
यावर काँग्रेसने सडकून टीका केली आहे. किरण काळे म्हणाले, ज्या अधिकाऱ्यांनी प्रशासक या नात्याने बजेट तयार केले आहे ते काही दिवसांनी बदल्या होऊन हे शहर सोडून जाणार आहेत. पण जाताना महानगरपालिकेच्या माध्यमातून नगरकरांना कर्जबाजारी करून जाण्याचा घाट त्यांनी घातला आहे. शेकडो कोटींच्या विकास कामांच्या नावाखाली कर्ज काढली जातील. दर्जाहीन कामे ठेकेदारांच्या माध्यमातून केली जातील. यातून ठेकेदार, मनपा प्रशासन आणि पुढारी संगनमत करून कोट्यावधींचा भ्रष्टाचार करतील. नगरकरांना कर्जबाजारी का करता ? त्याऐवजी भ्रष्टाचार करू नका, असा खोचक सल्ला नगरकरांच्या वतीने किरण काळेंनी मनपा बजेट सादर करणाऱ्या प्रशासनाला दिला आहे.
भ्रष्टाचाराचे हे एक उदाहरण, अशी अनेक आहेत :
सुमारे ७७८ रस्त्यांच्या कामांमध्ये सुमारे रू. २०० कोटीहून अधिक रकमेचा भ्रष्टाचार मनपाने अधिकारी, ठेकेदार, पुढारी यांच्या संगनमतातून झाला आहे. त्याची फिर्याद मी स्वतः काँग्रेसच्या वतीने अँटीकरप्शनकडे दिली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. भ्रष्टाचार करायचा, नगरकारांना लुटायचे आणि दुसरीकडे मनपा हिस्सा भरण्यासाठी कोट्यावधींचे कर्ज काढायचे. हे चुकीचे धोरण असल्याचे काळे यांनी म्हटले आहे. हे भ्रष्टाचाराचे केवळ एक उदाहरण असून अशी अनेक उदाहरणे आहेत. अमृत योजना, फेस टू योजना, कचरा संकलन योजना, श्वान निर्बीजीकरण यासह अनेक योजनांमध्ये मोठे घोटाळे झाले आहेत. यामध्ये राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा थेट सहभाग आहे त्यामुळे अशा प्रकारे पोकळ बजेट सादर करून नगरकरांच्या हाती गाजर देण्याचे काम मनपाने केले असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे.
पुतळ्यांसाठी तरतूद, मात्र ती अपुरी का ?
सारसनगर प्रभागात मनपाचे उभारले जाणारे तथाकथित रुग्णालय हे शाळेचे आरक्षण असणाऱ्या वादग्रस्त जागेवर उभे केले जात आहे. गेल्या अनेक महिन्यापासून तेही काम प्रलंबित आहे. नेहरू मार्केटची उभारणीची प्रक्रिया का बंद पडली ? शरण मार्केट पाडले. दिल्लीगेटचे गाळे पाडले, पुढे काय झाले ? नगरकरांना हे माहित आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रोफेसर चौक येथील पुतळ्याचे काम तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे काम अनेक वेळा आश्वासने देऊन देखील अनेक महिन्यांपासून रखडलेले आहे. पुतळ्यांसाठी बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे. ती अधिक रकमेची करणे आवश्यक होते. पण त्याचवेळी त्या तरतुदींचा प्रत्यक्षात उपयोग मनपा करत नाही, हे दुर्दैवी असल्याचे काळेंनी म्हटले आहे.
आधी पाणी तर द्या, मग मीटर बसवा :
शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आजही आठ-आठ दिवस पाणी येत नाही. बहुतांशी ठिकाणी दिवसा आड पाणी येते. त्यातही पुरेसे पाणी दिले जात नाही. रात्री अपरात्री महिलांना पाण्यासाठी जागे राहावे लागते. मुळात तुम्ही पाणीच ३६५ दिवस, मुबलक आणि स्वच्छ देऊ शकत नाही. तर मीटर काय बसवत आहात ? असा संतप्त सवाल किरण काळे यांनी केला आहे. फायनान्स कंपन्यांप्रमाणे उद्या मीटर बसून वसुलीसाठी दारात माणसं पाठवण्याचा हा घाट सुरू आहे. आधी नगरकरांना दररोज पाणी द्या. मग मीटर बसवा असा खोचक सल्ला काळे यांनी दिला आहे.
छुप्या पद्धतीने करवाढीचा नगरकरांवर बोजा :
मनपा बजेटमध्ये करवाढ करणार नाही असे म्हटले आहे. आगामी लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पडद्याआडून देण्यात आलेल्या राजकीय सूचनांनी प्रभावित होऊन सूचना हा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. ड्रोन द्वारे मालमत्तांचे सर्वेक्षण करून मालमत्ता कराची पुन्हा आकारणी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुळात अशा छुप्या पद्धतीने कर वाढ करण्याचा कोणताही नैतिक अधिकारच मनपाला नाही. राजकीय प्रभावातून निवडणुकांमुळे थेट करवाढ जरी करत नसले तरी देखील ड्रोन सर्वेक्षणाचे नाव पुढे करून नगरकरांच्या लुटीचा डाव आखला गेला असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने किरण काळे यांनी बजेटवर केला आहे.
घंटागाड्या गायब, वीज बिल सुद्धा भरत नाहीत ;
कचरा संकलन संस्थेचे गेल्या अनेक दिवसांचे बिल थकल्यामुळे त्यांनी घंटागाड्या बंद करण्याची घोषणा केली आहे. मुळात आधीच या गाड्या शहराच्या सर्व भागात पोहोचत नाहीत. आधीच अनेक घंटागाड्या गायब असून उरलेल्या देखील बंद होणार आहेत. वारंवार वीज बिल मनपा वेळेवर भरू शकत नाही म्हणून थेट वीज तोडली जाते. यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. पथदिवे बंद पडतात. शहर अंधारात बुडते. मनपा कर्मचाऱ्यांचे अनेक आर्थिक बाबींशी निगडित प्रश्न प्रलंबित आहेत. बजेटमध्ये या बाबींना दिलासा देणाऱ्या कोणत्याही गोष्टी नगरकरांसाठी नाहीत असे किरण काळे यांनी म्हटले आहे.
भविष्यात अमरधामाच्या आतही हे गाळे बांधतील ? :
बजेटमध्ये केडगाव व अमरधाम स्मशान भूमी येथे शासनाच्या निधीतून विद्युत अथवा गॅस दाहिनी प्रस्तावित करण्यात आली आहे. मुळात आज रोजी अमरधामच्या मुख्य रस्त्याला लागून भिंतीच्या आडून काही गाळ्यांचे बेकायदेशीर रित्या बांधकाम एका शहरातील बलाढ्य नेत्याच्या कार्यकर्त्यांच्या पोट भरण्यासाठी सुरू आहे. याला बजेट सादर करणाऱ्या मनपा प्रशासनाचा आशीर्वाद आहे. शहरातील नाट्य कलावंत आणि नाट्य रसिकांची सांस्कृतिक भूक भागविण्याकडे गेल्या अनेक वर्षांकडे जाणीवपूर्वक अनास्थेतून दुर्लक्ष होत असल्यामुळे सावेडीतील नाट्यगृहाचे काम आजही अपूर्ण अवस्थेत अक्षरश: बंद पडलेले आहे. मात्र त्याच नाट्यगृहाच्या सांगाड्या समोर आपल्या राजकीय कार्यकर्त्यांचे पोट भरण्यासाठी मात्र तातडीने गाळे उभारण्याचे काम सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल असे दिसते आहे. सत्तेचा गैरवापर कार्यकर्त्यांसाठी बेकायदेशीर कामे करण्या करिता केला जात आहे. मात्र बजेटच्या माध्यमातून नगरकरांना खऱ्या अर्थाने सोयी सुविधा यांना द्यायच्या नाहीत. शासनाच्या निधीतून विद्युत दाहिनीचे काम करण्याऐवजी मनपाने स्वनिधीतून शहरातील नागरिकांना मृत्यूनंतर तरी किमान विधीसाठी निधीची तरतूद करण्याची गरज होती. नागरीकरणाचा उपनगर भागात झालेला विस्तार लक्षात घेता सावेडीत स्मशानभूमीसाठी तरतूद करायलाच हवी होती. मात्र ती त्यांनी करणे सोयीस्करित्या टाळले आहे. आज अमरधामच्या भिंतीला लागून बेकायदेशीर गाळे उभे राहत आहेत. भविष्यात जिथे अंत्यविधी होतात त्या जागेवर देखील कार्यकर्त्यांसाठी गाळे उभारण्यात आले तरी नगरकरांना आश्चर्य वाटणार नाही, असा टोला किरण काळे यांनी मनपाच्या बजेटला लागावला आहे.
एकूण सन २०२४ - २०२५ या आर्थिक वर्षासाठीचे मनपाचे बजेट हे नगरकरांच्या तोंडाला पाणी पुसणारे आहे असे काँग्रेसने म्हटले आहे.
Post a Comment